एसटी महामंडळाच्या पाच कर्मचार्‍यांची आत्महत्या | पुढारी

एसटी महामंडळाच्या पाच कर्मचार्‍यांची आत्महत्या

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाच्या पाच कर्मचार्‍यांनी गेल्या महिनाभरात आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांना वेतन मिळावे याकरिता एसटी कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कर्मचार्‍यांना तीन सप्टेंबरपर्यत वेतन देण्याचे अंतरिम आदेश शुक्रवारी दिले. दरम्यान, शुक्रवारी धुळ्यात कर्मचार्‍यांनी आंदोलनही केले.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून एसटीची प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्न बुडाले आहे. उत्पन्नच मिळत नसल्याने दर महिन्याच्या सात तारखेला होणारे कर्मचार्‍यांचे वेतन रखडत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेतन प्रदान अधिनियम 1936 च्या तरतुदीनुसार किमान 10 तारखेपर्यंत मासिक वेतन देण्याची तरतुद असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही.

याविरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने औद्याोगिक न्यायालयात 23 ऑगस्टला दावा दाखल केला होता. या दाव्याची सुनावणी 27 ऑगस्टला झाली. यात 3 सप्टेंबरपर्यंत कर्मचार्‍यांना वेतन देण्याचे अंतरिम आदेश देण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.

दरम्यान, गेल्या महिन्याभरात आर्थिक संकटामुळे राज्यात एसटीच्या पाच कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. यात वेतन वेळेत मिळत नसल्याने आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागत असल्याचे प्रमुख कारण आहे.

लातूर विभागातील अहमदपूर आगारातील एका महिला वाहकाने, अकोला विभागातील तेल्हारा आगारातील वाहक, शहादा आगारातील चालकाने 23 ऑगस्टला, कंधार आगारातील एका कर्मचार्‍याने आत्महत्या केली. तर शुक्रवारी धुळे जिल्ह्यातील साक्री आगारातील चालक कमलेश बेडसे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांच्या तपासणीत बेडसे यांच्या खिशात चिठ्ठी आढळली.

त्यात वेतन नियमित होत नसल्याचे नमुद केले आहे. या घटनेनंतर साक्री आगारात काही वेळासाठी कामबंद आंदोलन झाले. धुळ्यातील चालकाच्या आत्महत्येनंतर महामंडळाचे संबंधित अधिकारी व शासनातील संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

Back to top button