मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची लढाई भाजपसोबतच | पुढारी

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची लढाई भाजपसोबतच

मुंबई : पुढारी वृत्तसेवा आपली लढाई भाजपसोबतच आहे. मागील महापालिका निवडणुकीतही आपण भाजपविरोधात लढलो आणि जिंकलो. आगामी निवडणुकाही आपणच जिंकणार, असा विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसोबत बोलताना व्यक्‍त केला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला. शिवसेना भवनात झालेल्या या बैठकीस माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह पालिकेतील माजी नगरसेवक उपस्थित होते. याशिवाय सुभाष देसाई, खा. अरविंद सावंत, खा. अनिल देसाई, आ. अनिल परब, आ. रवींद्र वायकर, सुषमा अंधारे आदी नेते उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की, शिवसेना सोडून गेलेले आमदार, खासदार पुन्हा निवडून येऊच शकत नाहीत. त्यामुळे शिंदे गटाला फारसे महत्त्व न देता कामाला लागा. गेली निवडणूक भाजपविरोधात लढलो आणि जिंकलो. आताही असेच चित्र असणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील संपर्क, लोकांचे प्रश्‍न आणि संघटन यावर भर द्या. दरम्यान, या बैठकीला 13 माजी नगरसेवक अनुपस्थित होते.

Back to top button