पानटपरीवाल्याचा मुलगा अल्टिमेट खो-खो लीगच्या संघाचा कर्णधार | पुढारी

पानटपरीवाल्याचा मुलगा अल्टिमेट खो-खो लीगच्या संघाचा कर्णधार

मुंबई; सुनील सकपाळ : इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील जयहिंद मंडळाचा खेळाडू विजय हजारे याची पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगमधील मुंबई खिलाडीज् संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. विजय हा सध्या रेल्वेमध्ये नोकरी करत असला, तरी प्रतिकूल परिस्थितीमधून वाटचाल करत खेळाडू बनला आहे. त्याचे वडील गजानन हे पानटपरी चालवतात.

गरीब कुटुंबातील असूनही आईचा पाठिंबा आणि खेळाडू बनण्याची इच्छा, यामुळे खो-खो खेळाकडे वळलो, असे विजय याने यावेळी सांगितले. माझ्या वडिलांची इचलकरंजी येथे पानटपरी आहे. त्यावर आमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. आम्ही तीन भावंडे. दोन मोठ्या बहिणींची लग्ने झाली आहेत. माझ्या आईला (गीता) खेळाची आवड होती. धावणे आणि खो-खो तिला आवडायचे. ती जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये खेळली आहे. मात्र, त्यावेळी खो-खो खेळ तितका प्रसिद्ध नसल्याने ती पुढे वाटचाल करू शकली नाही. शाळेमध्ये मला धावण्याची आवड होती. चांगला रनर असल्याने हा भविष्यात चांगला खेळाडू बनू शकतो, असे लक्षात आल्यावर आईने मला प्रोत्साहन दिले. माझे शिक्षण गोविंदराव हायस्कूलमध्ये झाले. या शाळेने अनेक प्रसिद्ध खो-खोपटू देशाला दिलेत. आईनंतर शाळेतील शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे याच खेळात कारकीर्द करण्याचे ठरवले, असे विजय म्हणाला.

इथवरच्या वाटचालीत इचलकरंजी येथील जयहिंद मंडळाचा मोठा वाटा असल्याचे विजय याने आवर्जून सांगितले. आमचे जयहिंद मंडळ म्हणजे खो-खो खेळाडूंची फॅक्टरी आहे. तिथे सुनील कुचेकर, अमित कागले, अमित नवाले यांनी खेळातील बारकावे समजून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होत आहे. पुढे रेल्वेमध्ये नोकरी लागल्यानंतर मध्य रेल्वे संघाचे प्रशिक्षक सुधीर म्हस्के यांनी माझ्या खेळाला पैलू पाडले, असे त्याने म्हटले. विजय याने कनिष्ठ (18 वर्षांखालील) राष्ट्रीय स्पर्धेत तीनवेळा कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 2013 मध्ये तो वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा खेळला आहे. या स्पर्धांतील सर्वोत्तम खेळाच्या बळावर विजय याला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली.

रेल्वेमध्ये असूनही अद्याप भाड्याच्याच खोलीमध्ये राहतो

रेल्वेतील नोकरी आणि थोडी परिस्थिती सुधारली, तरी वडिलांनी त्यांचा पानटपरीचा व्यवसाय कायमस्वरूपी करावा, असे मला वाटते. अजून आमच्यावर थोडे कर्ज आहे. घरी बसून राहणे त्यांना आवडणार नाही. त्यातच रेल्वेमध्ये नोकरी करत असलो, तरी अद्याप इचलकरंजीमध्ये भाड्याच्याच खोलीमध्ये राहतो, असे विजय याने सांगितले.

प्रथमच फाईव्ह स्टार हॉटेल पाहिले; पहिला व्हिडीओ कॉल आईला

अल्टिमेट लीगच्या निमित्ताने माझ्यासह अनेक खेळाडूंना प्रथमच पंचतारांकित (फाईव्ह स्टार) हॉटेलमध्ये राहायला मिळाले. आमचे शिबिर बालेवाडी, पुणे येथे सुरू आहे. यानिमित्ताने हॉटेलमध्ये वास्तव्य आहे. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पहिल्यांदा आईला व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर मित्र आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना रूमचे व्हिडीओ पाठवले.

Back to top button