Pratap Sarnaik : 'केंद्र व राज्य सरकारच्या भांडणात माझा बळी जात आहे' | पुढारी

Pratap Sarnaik : 'केंद्र व राज्य सरकारच्या भांडणात माझा बळी जात आहे'

मुंबई, पुढारी ऑनलाईन : “ईडीच्या चौकशीत मी आणि माझे कुटुंबिय सहकार्य करीत आहे. पण, या सर्वांमध्ये माझी आणि माझ्या कुटुंबाची फरपट झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात माझ्यासारख्या आमदाराचा बळी जात आहे”, अशी खंत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी व्यक्त केली.

ठाण्यात दहीहंडीनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, “तो विषय माझ्या दृष्टीने जुना झाला आहे. त्यानंतर भरपूर पावसाळा आणि वादळ-वारा होऊन गेला आहे”, असंही त्यांनी पत्रकारांना सांगितले.
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सहकार्य
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरु करण्यात आलेल्या चौकशीला आपण पूर्ण सहकार्य करणार आहोत. दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देखील आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्यात आलेला नसून चौकशीच्या दरम्यान पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. आता ही बाब न्याय प्रविष्ठ असल्याने यावर अधिक भाष्य करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेमध्ये नाराज नाही
 
शिवसेनेच्या भुमिकेबाबत नाराज आहात का? यावर त्यांना विचारले असता, मी शिवसेनेबाबत नाराज नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. जर मी शिवसेनेत नाराज असतो तर  माझा  कार्यक्रमांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आले असते का? असा उलट सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुख असून शिवसेनेत मी नाराज नाही असे त्यांनी सांगितले.
माझ्या कुटुंबाची फरफट झाली
 
ईडीच्या माध्यमातून सुरु असलेल्या चौकशीला मी आणि माझे  कुटुंब संपूर्णपणे सहकार्य करीत आहे. परंतु या सर्वात माझी आणि माझ्या  कुटुंबाची फरफट झाली आहे. मी जी भूमिका मांडली त्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावरून चौकशी लावली असली तरी यात माझ्या कुटुंबाचा यात काय दोष होता. त्यामुळे हा सर्व प्रकार वेदनादायी आहे. तसेच माझ्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्या विरोधात मी न्यायालयात धाव घेतली असल्याचेही त्यांनी पुन्हा सांगितले. त्यानुसार या प्रक्रियेत मला संरक्षणदेखील मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा…

Back to top button