सर्वच कर्जे महागणार | पुढारी

सर्वच कर्जे महागणार

मुंबई : वृत्तसंस्था वाढत्या महागाईची चिंता रिझर्व्ह बँकेलाही सतावते आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी पतधोरण जाहीर केले. रेपो रेटमध्ये बँकेने 0.50 टक्के वाढ केली आहे. चार महिन्यांत रेपो रेट 4.90 टक्क्यांवरून 5.40 टक्के झाला आहे. रेपो रेट दरवाढीचा परिणाम म्हणून सर्व प्रकारची कर्जे आता महागणार आहेत. गृह कर्जापासून ते वाहन, पर्सनल लोनपर्यंत सारे काही महागणार आणि कर्जापोटी जास्तीचा ईएमआय भरावा लागणार आहे. ठेवीदारांसाठी मात्र ही खुशखबर म्हणावी लागेल. व्याज दरवाढीचे चक्र पुढे सुरू राहिले तर मुदतठेवीचे व्याज दर 8 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

रेपो रेट दरात असे झाले बदल

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक चालू आर्थिक वर्षातील पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली होती. तेव्हा रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवला होता. नंतर 2 व 3 मे रोजी तातडीची बैठक बोलावून रेपो रेट 4.40% करण्यात आला. नंतर 6 ते 8 जूनपर्यंत चाललेल्या समितीच्या बैठकीत रेपो रेट 0.50% ने वाढविला गेला. त्यामुळे रेपो रेट 4.40% वरून 4.90% झाला होता. आता ऑगस्टमध्ये त्यात 0.50% वाढ झाली
आहे.

20 वर्षांसाठी 30 लाखांच्या गृह कर्जाचा ईएमआय वाढणार जवळपास 900 रुपयांनी
जगनने आधी अन् मगनने नंतर कर्ज घेतले तर हे घडेल

 महागाईची चिंता रिझर्व्ह बँकेलाही; रेपो रेट 4 महिन्यांत 4.90 वरून 5.40 टक्के

1 उदाहरणार्थ जगनने 7.55 टक्के दराने 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले आहे. त्याच्या कर्जाचा ईएमआय 24,260 रुपये आहे, तर 20 वर्षांत त्याला या दराने 28,22,304 रुपये व्याज अदा करावे लागतील. जगनला या हिशेबाने 30 लाखांच्या बदल्यात एकूण 58,22,304 रुपये
भरावे लागेल.

2 जगनने कर्ज घेतल्यानंतर एका महिन्यातच समजा, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 0.50 टक्यांनी वाढवला. आता बँकाही व्याज दर 0.50 टक्क्यांनी वाढवतील. आता जगनचा भाऊ मगन कर्ज घ्यायला बँकेत गेला तर बँक त्याला 7.55 ऐवजी 8.05 टक्के व्याज दर सांगते.

3 मगनही 20 वर्षांसाठी 30 लाख रुपये कर्ज घेतो. पण त्याला ईएमआय 25,187 रुपये भरावा लागतो. जगनपेक्षा त्याला तेवढ्याच कर्जासाठी 927 रुपये जास्त भरावे लागतात. मगनला 20 वर्षांत एकूण 60, 44,793 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच जगनपेक्षा मगनला बसणारा व्याजाचा भुर्दंड 2,22,489 रुपयांनी अधिक असेल.

आणखी काय म्हणाले गव्हर्नर शक्‍तिकांत दास?

आर्थिक वर्ष 2023 मध्ये वास्तविक अंदाजित जीडीपी वाढ 7.2 टक्के

पुरवठा वाढल्याने खाद्यतेल दर घटले

आर्थिक वर्ष 23 मध्ये महागाई दर 6.7 % शक्य

चालू खात्यातील तूट हे चिंतेचे कारण नाही

भारतीय अर्थव्यवस्थेवर महागाईचा परिणाम

जागतिक चलनवाढ हा चिंतेचा विषय आहे

एमएसएफ (मार्जिनल स्टँडिंग फॅसिली)

5.15 % वरून 5.65 % वर वाढला

एप्रिलच्या तुलनेत महागाई कमी

 शहरी मागणीत सुधारणा होत आहे

 बँकांची पत वाढ वार्षिक 14 टक्के वाढली

चांगल्या पावसामुळे ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा शक्य

अमेरिकन फेडरलपाठोपाठ निर्णय

अमेरिकेतील महागाई 1980 नंतर कमाल पातळीवर (जूनमध्ये 9.01 टक्के) गेल्यानंतर ‘फेडरल रिझर्व्ह’चे (अमेरिकन मध्यवर्ती बँक) अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनीही व्याज दर पुन्हा वाढू शकतात, असे स्पष्ट केले आहे. या बँकेनेही अलीकडेच व्याज दरात वाढ केली होती. अमेरिकेत व्याज दरात एकूण 2.50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. महागाई 2 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा अमेरिकन मध्यवर्ती बँकेचा प्रयत्न आहे.

 

Back to top button