पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचे समन्स, उद्या चौकशीसाठी बोलावले | पुढारी

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचे समन्स, उद्या चौकशीसाठी बोलावले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. त्यांना उद्या ६ ऑगस्ट रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.

गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्‍यात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयात ईडीने संजय राऊत माहिती देत नाही, असा आरोप करीत त्यांच्या घरातून महत्वाची कागदपत्रे मिळाली. आतापर्यंत १ कोटी ६ लाखांची माहिती मिळाली. वर्षा राऊत यांच्या खात्यातून एक कोटी आठ लाख रुपयांचे पैसे वळवल्याची माहिती आहे, हे पैसे का काढण्यात आले तसेच याची आणखी माहिती काढायची आहे, असा युक्तिवाद ईडीकडून न्यायालयात करण्यात आला होता. ईडीने आणखी ६ दिवसांची म्हणजेच १० ऑगस्टपर्यंत कोठडीची मागणी केली होती. तर संबंधितांना ८ ऑगस्टपर्यंत हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. तर संजय राऊत यांच्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत आहे असा युक्तिवाद राऊत यांच्या वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ईडीने संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ केली.

सुमारे १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात सुमारे १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनी लाँड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. पत्राचाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यांत संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनी सहभागी होती. पुढे ही कंपनी त्यातून बाहेर पडली. मात्र, या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा झाला होता. प्रवीण राऊत यांना या व्यवहारात मिळालेल्या पैशांतील काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही खात्यात वळविण्यात आल्याचा आरोप आहे.

घोटाळ्यातील पैशांतून वर्षा राऊत यांच्या नावाने दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहीम येथे भूखंडांची खरेदी करण्यात आल्याचा ठपका ठेवत ईडीने अशा ११.१५ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. याच अनुषंगाने ईडीने राऊत यांची यापूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने जुलै महिन्यात पुन्हा एकदा चार वेळा चौकशीसाठी समन्स जारी केले होते. यातील एका वेळी राऊत हे चौकशीला हजर राहिले. मात्र, अन्य समन्सला ते अनुपस्थित राहिले. अखेर ईडीने राऊत हे चौकशीला हजर न राहून सहकार्य करत नसल्याची नोंद करत गेल्या रविवारी सकाळी राऊत यांच्या घरी छापेमारी केली होती.

Back to top button