Stock Market Updates : अमेरिका-चीन तणावाचे शेअर बाजारावर सावट; आशियाई बाजार सतर्क, सेन्सेक्स, निफ्टीत घसरण | पुढारी

Stock Market Updates : अमेरिका-चीन तणावाचे शेअर बाजारावर सावट; आशियाई बाजार सतर्क, सेन्सेक्स, निफ्टीत घसरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज भारतीय शेअर बाजार (Stock Market Updates) तेजीत उघडला होता. सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १०० अंकांनी वाढून ५८,२३६ वर आणि निफ्टी २५ अंकांनी वाढून १७,३७४ वर पोहोचला होता. मात्र, अमेरिका आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या तणावाचा परिणाम जागतिक बाजारांवर होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, सकाळी ११ च्या सुमारास सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काही प्रमाणात घसरण दिसून आली. सेन्सेक्स २१५ अंकांनी तर निफ्टी ८० अंकांनी खाली आला होता. त्यानंतर दोनच्या सुमारास सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झालेली घसरण अनुक्रमे १३६ आणि ६९ अंकांची होती. सेन्सेक्स ५८ हजारांवर तर निफ्टी १७ हजारांवर व्यवहार करत आहे. (Stock Market Updates)

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यावरुन चीन आणि अमेरिका आमने-सामने आले आहेत. यामुळे युद्धाचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजार सतर्क झाल्याचे दिसत आहे. आशियातील शेअर बाजारांवर अद्याप याचा काही मोठा परिणाम दिसून आलेला नाही. सिंगापूर एक्सचेंज लिमिटेड (SGX) काही प्रमाणात तेजी दिसून येत आहे. तर अमेरिकी बाजार काल १ टक्क्याहून अधिक घसरून बंद झाला होता. आज US Futures मधून संमिश्र संकेत मिळत आहेत.

चीनसोबत तणाव वाढल्याने अमेरिकेतील बाजारात घसरण दिसून येत आहे. अमेरिकेतील डाऊ जोन्स (DOW JONES) शेअर बाजार ४०० हून अधिक अंकांनी घसरला होता. NASDAQ हा शेअर बाजाराचा निर्देशांक २० अंकांनी घसरून बंद झाला होता.
चीनच्या धमक्या आणि इशाऱ्यांना न जुमानता मंगळवारी नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये (Taiwan) दाखल झाल्या. पेलोसी यांनी तैपेई येथे तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. विशेष म्हणजे त्यांच्या या दौर्‍याला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आधीच हरकत घेतली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी व्हर्च्युअल चर्चेतही, आगीशी खेळाल तर जळून खाक व्हाल, अशी थेट धमकी जिनपिंग यांनी दिली होती.

Back to top button