राज्यात दीड वर्षात झाले 22 हजार बालमृत्यू | पुढारी

राज्यात दीड वर्षात झाले 22 हजार बालमृत्यू

चिपळूण; समीर जाधव : गेल्या दीड वर्षात राज्यभरात तब्बल 22 हजार 751 बालमृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी 19 हजार 663 अर्भक मृत्यू आहेत तर 3 हजार 78 बालमृत्यू असून राज्यातील प्रगत जिल्ह्यांमध्ये बालमृत्युंमध्ये होणारी वाढ चिंताजनक बनली आहे. विशेषकरून सर्वात कमी बालमृत्यू सिंधुदुर्ग तर जास्त बालमृत्यू प्रगत असलेल्या मुंबई, मुंबई उपनगर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्ह्यात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

शासन महिला व बाल आरोग्य सुधारावे यासाठी विविध योजना राबवित असते. या योजनांवर दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा खर्च होत असतो. तरीही बालमृत्युंमध्ये घट होताना दिसत नाही. गेल्या 17 महिन्यांच्या कालावधीतील ही आकडेवारी असून प्रगत जिल्ह्यातच ही आकडेवारी वाढली आहे. त्यामुळे हा विषय गंभीर बनला आहे. राज्याच्या कुटुंबकल्याण कार्यालयाकडून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2021 ते मे 2022 या सतरा महिन्यात 0 ते 5 वयोगटातील ही आकडेवारी आहे. यामध्ये सर्वात जास्त बालमृत्यू मुंबई आणि मुंबई उपनगरात झाले असून 1 हजार 898 आहेत तर नागपूरमध्ये 1 हजार 741, औरंगाबादमध्ये 1 हजार 349, नाशिकमध्ये 1 हजार 127, पुणेमध्ये 1 हजार 181, अकोला 1 हजार 94, नंदूरबारमध्ये 1 हजार 26, ठाणेमध्ये 1 हजार 15 बालमृत्युंची नोंद झाली आहे. नंदूरबार व अकोला हे जिल्हे वगळल्यास उर्वरित जिल्हे प्रगत आहेत. त्यामुळे हा विषय चिंतेचा बनला आहे. या जिल्ह्यात बालमृत्युचे प्रमाण 43 टक्के आहे.

बालकांच्या पोषणासाठी शासन विविध बारा प्रकारच्या योजना राबविते. मात्र, त्याचा परिणाम प्रगत जिल्ह्यांमध्ये होताना दिसून येत नाही. मात्र, दुसर्‍या बाजूला कोकणातील सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी 64 व मराठवाड्यातील वाशीम 89, लातूरमध्ये 125 बालमृत्यू झाले आहेत.
जिल्हानिहाय बालमृत्युची आकडेवारी लक्षात घेतल्यास बालकांच्या कुपोषणाचा मुद्दा पुढे येत आहे. त्यामुळे भविष्यात या दृष्टीने सक्षमपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे. राज्यातील जिल्हानिहाय बालमृत्युची संख्या पुढीलप्रमाणे आहे. अकोला-1094, कोल्हापूर – 744, सांगली- 876, सातारा- 495, सोलापूर- 999, ठाणे- 1,015, रायगड – 346, पालघर- 465, पुणे – 1,081, नाशिक- 1,127, मुंबई (बृहन्मुंबई)- 582, मुंबई – 1317, रत्नागिरी-212, सिंधुदुर्ग – 64, अमरावती- 837, बुलढाणा- 392, वाशीम – 89, यवतमाळ-262, औरंगाबाद- 1,349, हिंगोली- 209, जालना- 232, परभणी – 166, बीड- 677, लातूर- 125, नांदेड- 275, उस्मानाबाद- 213, भंडारा- 354, चंद्रपूर- 714, गडचिरोली- 516, गोंदिया- 441, नागपूर- 1741, वर्धा- 277, अहमदनगर- 707, जळगाव- 794, धुळे- 909, नंदूरबार- 1026. असे बालमृत्यू झाले आहेत. राज्याचा इतिहास लक्षात घेता गेली अनेक वर्षे बालमृत्यूचे जास्त प्रमाण हे आदिवासी आणि राज्यातील दुर्गम खेडोपाड्यांमध्ये होते. कुपोषणामुळे बालमृत्यू वाढत होते. मात्र, ही आकडेवारी लक्षात घेतल्यास राज्यातील प्रगत जिल्ह्यांमध्ये बालमृत्यू मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हान उभे राहिले आहे.

केस स्टडी व्हायला हवा : डॉ. समीर दलवाई

गेल्या सतरा महिन्यातील बालमृत्यूचा आकडा पाहिल्यास हा प्रगत जिल्ह्यांमध्ये जास्त असला तरी त्यामागची कारणे शोधणे गरजेचे आहे. विशेषकरून त्या पूर्वीचा डाटादेखील संकलित करणे आवश्यक ठरणार आहे. जन्मजात अर्भक, शून्य ते एक वर्ष आणि एक ते पाच वर्षे अशा तीन टप्प्यात बालमृत्युंचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जन्मजात बालकांचा मृत्यू होणे यामध्ये मातेचासुद्धा संबंध असतो. त्यामुळे बालमृत्यूला अनेक पैलू कारणीभूत ठरू शकतात. या प्रश्नावर विशेषत्वाने अभ्यास व्हायला हवा. जर प्रगत जिल्ह्यांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण वाढत असेल तर त्या मागची कारणे शोधली पाहिजेत. निदान सतरा महिन्यातील शहरात वाढलेली बालमृत्यूची आकडेवारी लक्षात घेऊन ‘केस स्टडी’ म्हणून त्याचा अभ्यास व्हायला हवा. तरच त्यावर आपल्याला उपाय करता येईल, असे मुंबईतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Back to top button