Shivsena : ‘शिवसेने’चा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाला घेवू द्या ! शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयाला विनंती | पुढारी

Shivsena : ‘शिवसेने'चा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाला घेवू द्या ! शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटा पाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून उद्धव ठाकरे यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्याची विनंती त्यातून करण्यात आली आहे. ‘खरी शिवसेना’ कुणाची? यासंबंधीचा निर्णय घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाला दिली जावी, अशी विनंती देखील करण्यात आली आहे. लोकशाही पद्धतीने पक्षात झालेल्या विभाजनाच्या मुद्दयावर न्यायालयाने हस्तक्षेप करून नये, अशी विनंती देखील शिंदे गटाने केली आहे.

लोकशाहीतील संसदीय स्वरुपात कुठल्याही कारवाईला वैध, अवैध ठरवण्यासाठी ज्यांच्याकडे बहुमत नाही अथवा ज्यांनी बहुमत गमावले असा गट दबाब टाकू शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा गट लोकशाहीतील निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहे. सदस्यांनी स्वेच्छेने घेतलेल्या निर्णयाला या गटाकडून आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाकरे बहुमतात असलेल्या या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा शिंदे गटाने प्रतिज्ञापत्रातून केला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टला शिवसेनेसंबंधीच्या (Shivsena) वादावर दोन्ही गटाकडून दावे तसेच हरकती मागवून घेत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

अपात्र आमदारांसंबंधी निकाल येईस्तोवर निवडणूक आयोगाला कुठलाही निर्णय सुनावण्यापासून रोकण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. पंरतु, १५ आमदार ३९ आमदारांच्या गटाला बंडखोर म्हणू शकत नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाने प्रतिज्ञापत्रातून केला आहे. आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करून नये. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून घेण्यात आलेल्या बहुमत चाचणीचा देखील प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

ठाकरे गटाकडून कोश्यारी यांच्या निर्णयाला देखील आव्हान देण्यात आले आहे. शिवसेनेसंबंधीत सर्व याचिकांवर आज, सोमवारी सुनावणी होणार होती. पंरतु, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने ३ ऑगस्टला याप्रकरणावर सुनावणी होईल. एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगात अर्ज दाखल करून स्वतःलाच खरी शिवसेना घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यावर निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरू आहे. अशात ३ ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

Back to top button