आशिष शेलार : धमक्यांना घाबरत नाही, पोलीस बाजूला ठेवून या, दोन हात करू | पुढारी

आशिष शेलार : धमक्यांना घाबरत नाही, पोलीस बाजूला ठेवून या, दोन हात करू

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आशिष शेलार : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कानशिलात वक्तव्याने अटकेची कारवाई झाल्याने राज्यातील भाजप नेत्यांमध्ये संताप पसरला आहे.  आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला जाहीर आव्हान दिले.

धमक्यांना घाबरत नाही, आंदोलन करणाऱ्यांनी पोलीस बाजूला ठेवून यावे, आपण दोन हात करू, असे जाहीर आव्हानच शेलार यांनी शिवसेनेला दिले. तालिबानीही आत्महत्या करतील अशी राज्यात झुंडशाही सुरु असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

मंत्र्यासह आयपीएस अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे

आशिष शेलार यांनी राणेंच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब यांनी दबाव टाकल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, गृह खात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अनिल परब यांनी प्रयत्न केला. न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच त्यांनी निवाडा घोषित केला. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा अपमान झाला.

त्यामुळे हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असल्याने दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह आयपीएस अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली.

शिवसेनेकडून गलिच्छ राजकारण

शेलार यांनी शिवसेनेकडून गलिच्छ राजकारण होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, अदखलपात्र गुन्ह्यामध्ये केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण एक गोष्ट लक्षात असू द्या सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करणार आहोत.

शरद पवार यांना एका व्यक्तीने कानशिलात लगावली. तेव्हा त्यांनी त्या माणसाला माफ केले, पण संयमित माणसासोबत राहून संकुचित वृत्तीचं दर्शन शिवसेनेकूडन होत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

हे ही वाचलं का?

Back to top button