घनकचरा प्रकल्पावरुन ठाकरे समर्थक नगरसेवक प्रताप सरनाईक यांच्या विरोधात | पुढारी

घनकचरा प्रकल्पावरुन ठाकरे समर्थक नगरसेवक प्रताप सरनाईक यांच्या विरोधात

भाईंदर; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटातील आ. प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार शहरात 10 मिनी घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. हे प्रकल्प नागरी वस्त्यांमध्ये सुरु केले जाणार असल्याने त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा मुद्दा उपस्थित करीत या प्रकल्पांना ठाकरे समर्थक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवून हे प्रकल्प रद्द करण्याचे पत्र आयुक्त दिलीप ढोले यांना दिले आहे.

यामुळे एकेकाळी सरनाईक यांच्याच नेतृत्वाखाली पक्षकार्य करणारे शिवसेना नगरसेवक त्यांच्या प्रयत्नाने साकारणाऱ्या प्रकल्पांविरोधात उभे ठाकल्याने शहरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाला पर्याय म्हणून आयुक्त दिलीप ढोले यांनी स्थानिक गृहनिर्माण संस्थांमधील कचऱ्याची त्याच ठिकाणी विल्हेवाट लावण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. त्यानुसार सरनाईक यांनी शासनाकडे केलेल्या मागणीनुसार शासनाने 10 मिनी घनकचरा प्रकल्पांसाठी 50 कोटींचा निधी मंजूर करून त्यातील 5 कोटींचा निधी पालिकेकडे वर्ग केल्याचे सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र या प्रकल्पांचा 75 टक्के खर्च शासनाकडून तर 25 टक्के खर्च पालिकेकडून केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यापुर्वी भाजपने उपमहापौर हसमुख गेहलोत यांच्या माध्यमातून भाईंदर पुर्वेच्या पालिका आरक्षित भूखंडावर सुक्या कचऱ्यावर प्रक्रीया करणारा प्रकल्प मोफत सुरू करण्यात येणार होता. त्याला तत्कालिन महासभेने मान्यता देखील दिली. त्याला सरनाईक यांनी तीव्र विरोध दर्शवून तो प्रकल्प सुरू होण्याआधीच बंद पाडला. असे असतानाही सरनाईक यांनी भाईंदर पुर्वेकडील प्रभाग क्रमांक 3 मधील साईबाबा नगर, प्रभाग समिती क्रमांक 4 कार्यालयाशेजारी, प्रभाग 10 मधील गोडदेव गावातील तलावाशेजारी, प्रभाग 11 मधील नवघर गावातील मैदानाशेजारी, प्रभाग 12 मधील स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानाशेजारी, मीरारोड येथील प्रभाग 13 मधील सेव्हन इलेव्हन शाळेशेजारी व तिवारी कॉलेज शेजारी, प्रभाग 14 मधील काशिमीरा तलावाशेजारी व महाजनवाडी, प्रभाग 18 मधील जीसीसी क्लब शेजारी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रत्येकी 10 टनांचे 10 मिनी प्रकल्प सुरू करण्याचा पाठपुरावा स्थानिकांना विचारात न घेताच शासनाकडे केला.

शासनाने सुद्धा त्या प्रकल्पांना मंजूरी देत 50 कोटींचा निधी कसा काय दिला. हे प्रकल्प मंजूर होण्यापुर्वी सरनाईक यांना स्थानिकांना विचारात घ्यावेसे वाटले नाही का ? असा संतप्त प्रतिक्रिया जयंतीलाल पाटील, नगरसेविका तारा घरत, स्रेहा पांडे, प्रवक्ता शैलेश पांडेय, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी पवन घरत यांनी व्यक्त केल्या आहेत. ज्या ठिकाणी नागरी वस्ती नाही अशा ठिकाणी हे प्रकल्प सुरू करावेत. नागरी वस्त्यांत असे प्रकल्प सुरू करुन तेथील लोकांचे आरोग्य बिघडवू नये, अशी मागणी करीत त्यांनी प्रस्तावित घनकचरा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Back to top button