जि.प., महापालिकांतील ओबीसींच्या जागा घटणार | पुढारी

जि.प., महापालिकांतील ओबीसींच्या जागा घटणार

मुंबई; दिलीप सपाटे : निवृत्त मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या समर्पित आयोगाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी मान्य केल्यामुळे राज्यात ओबीसींना आरक्षण पुन्हा बहाल झाले असले, तरी जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये काही ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या जागा घटणार आहेत. जिल्हा परिषदांमधील ओबीसींच्या आधीच्या राखीव जागांमधून 199 जागा कमी होणार आहेत, तर जिल्हा परिषदांच्या ओबीसींच्या 68 जागा घटणार आहेत.

बांठिया आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरसकट 27 टक्के आरक्षणाची शिफारस न करता महापालिका, नगर परिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती ते ग्रामपंचायतनिहाय लोकसंख्येचा डेटा गोळा केला आहे. या लोकसंख्येच्या आधारे आरक्षणाची शिफारस केली आहे. त्यामुळे अनेक महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतींमधील ओबीसी राखीव जागांची संख्या घटल्याचे अहवालातून दिसून येत आहे.

यापूर्वी 27 महापालिकांमध्ये 27 टक्के आरक्षणाप्रमाणे 740 जागा आधी राखीव होत्या. आता त्यात कपात होणार आहे. ओबीसींना आयोगाने एकूण 672 जागा राखीव करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे 68 जागा घटणार आहेत. विशेषतः, ठाणे महापालिकेत 21, नवी मुंबईत 7, नागपूर 8, कोल्हापूर 3, परभणी 6, तर मीरा-भाईंदर महापालिकेत ओबीसी नगरसेवकांच्या 9 जागा घटणार आहेत.
जिल्हा परिषदांच्या 199 ओबीसी जागांमध्ये घट होणार आहे. आधी 34 जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींच्या 535 जागा राखीव होत्या. आता त्या 336 असतील. यापूर्वी ओबीसींची 52 टक्के लोकसंख्या गृहीत धरून 27 टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र, आता बांठिया आयोगाच्या अहवालात राज्यातील ओबीसींची एकूण लोकसंख्या 37 टक्के असल्याचे नमूद केले आहे.
त्यामुळे लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार काही ठिकाणी ओबीसींच्या आरक्षणात कपात होणार आहे.

बांठिया आयोगाने महापौर आणि नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाचे प्रमाणही निश्‍चित केले आहे
27 महापालिकांसाठी 26 टक्क्यांप्रमाणे महापौर आरक्षण : 7 जागा
246 नगर परिषदांसाठी 27 टक्क्यांप्रमाणे नगराध्यक्षपदाचे आरक्षण : 66 जागा
139 नगरपंचायतीत 27 टक्के नगराध्यक्ष जागा आरक्षित : 37 जागा
34 जिल्हा परिषदांमध्ये 23.2 टक्के अध्यक्षांच्या जागा राखीव : 7 जागा
351 पंचायत समित्यांमध्ये 23.2 टक्के सभापती जागा आरक्षित : 81 जागा

बांठिया आयोग काय म्हणतो?
सरसकट 27 टक्के आरक्षणाची शिफारस न करता प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून महानगरपालिकेपर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची शिफारस.                                                                                                        राज्यात ओबीसींची लोकसंख्या किती, या प्रश्‍नावर आयोगाने मतदार यादीच्या आधारे केलेल्या अभ्यासानुसार 37 टक्के लोकसंख्या असल्याचे ठळकपणे नमूद केले आहे.
अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाला धक्‍का न लावता 50 टक्क्यांच्या आत आरक्षण ठेवले जावे. यासाठी इतर मागासवर्गीयांना निवडणुकांमध्ये 27 टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली असली, तरी ते प्रमाण सरसकट असणार नाही. ते प्रत्येक ठिकाणी लोकसंख्येनुसार वेगळे असावे.
अहवालाच्या शिफारशीनुसार, सरसकट 27 टक्के आरक्षण रद्द होत असल्याने 27 महापालिकांमध्ये ओबीसींसाठी राखीव असलेल्या 740 जागांमध्ये कपात होणार आहे. आता महापालिकांमध्ये ओबीसींना 672 जागा राखीव असतील.
जिल्हा परिषदांच्या ओबीसी राखीव जागांची संख्या ही 535 वरून 336 एवढी खाली येणार आहे.
बांठिया आयोगाने 27 टक्के आरक्षणाची शिफारस केलेल्या महापालिका
अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी-निझामपूर, मुंबई, धुळे, जळगाव, कल्याण-डोंबिवली, लातूर, मालेगाव, नांदेड, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, उल्हासनगर, वसई-विरार.
अन्य महापालिकांमध्ये शिफारस केलेली ओबीसी आरक्षणाची टक्केवारी
चंद्रपूर 22.9, मीरा-भाईंदर 18.4, कोल्हापूर 23.9, नागपूर 22.7, नवी मुंबई 20.5, पनवेल 25.2, परभणी, 17.9, ठाणे 10.4.

या पालिकांमध्ये ओबीसी टक्‍का घटणार
1) चंद्रपूर 15 (18)
2) मीरा-भाईंदर 17 (26)
3) कोल्हापूर 19 (22)
4) नागपूर 33 (41)
5) नवी मुंबई 23 (30)
6) पनवेल 20 (21)
7) परभणी 12 (18)
8) ठाणे 14 (35)

महापालिकानिहाय ओबीसी आरक्षण जागा
(कंसात सरसकट 27 टक्के आरक्षण असतानाच्या जागा)

1) अहमदनगर 18 ( 18)
2) अकोला 21 (22)
3) अमरावती 23 (23)
4) औरंगाबाद 31 (31)
5) भिवंडी-निझामपूर 24 (24)
6) बृहन्मुंबई 61 (61)
7) धुळे 19 (20)
8) जळगाव 20 (20)
9) कल्याण-डोंबिवली 32 (33)
10) लातूर 18 (19)
11) मालेगाव 22 (23)
12) नांदेड 21 (22)
13) नाशिक 32 (33)
14) पिंपरी-चिंचवड 34 (35)
15) पुणे 43 (44)
16) सांगली-मिरज-कुपवाड 21 (21)
17) सोलापूर 27 (28)
18) उल्हासनगर 21 (21)
19) वसई-विरार 31 (31)

Back to top button