सोडून गेले ते बंडखोर नव्हेत, गद्दारच : उद्धव ठाकरे | पुढारी

सोडून गेले ते बंडखोर नव्हेत, गद्दारच : उद्धव ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा सत्तेसाठी आपल्याला जे सोडून गेले ते बंडखोर नव्हतेच, ते गद्दारच आहेत,अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांवर शुक्रवारी हल्लाबोल केला. जाणारे गेले आता जोमाने तयारीला लागा, असे निर्देशही ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांना दिले.

शिवसेनेतील बंडाळीनंतर शिवसेना भवन आणि मातोश्री येथे विविध जिल्ह्यांतील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी, शिवसेना भवनात उस्मानाबाद, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यात उद्धव ठाकरे यांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी, खासदार अरविंद सावंत, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना नेते दिवाकर रावते, आमदार सचिन अहिर, आमदार कैलास पाटील आदी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिंदे सरकारवरही टीकेची झोड उठवली. शिंदे सरकारने नामांतराला स्थगिती दिली, हेच का त्यांचे हिंदुत्व, असा टोला त्यांनी लगावला. उस्मानाबादच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बंडखोरीवर संताप व्यक्त करणार्‍या शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. अंगावर आल्यास मात्र शिंगावर घ्या, असा संदेशही दिला.

यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांना पुन्हा पक्षात स्थान देऊ नये, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. यावर, गेले ते गेले. त्यांना आता स्थान नाही. ते काही बंडखोर नाहीत, तर गद्दार आहेत. त्यामुळे तुम्ही आता पुन्हा जोमाने कामाला लागा, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचा

Back to top button