कल्याण डोंबिवली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला २० वर्षे कारावासाची शिक्षा | पुढारी

कल्याण डोंबिवली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला २० वर्षे कारावासाची शिक्षा

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : कल्याण डोंबिवली येथे सातत्याने बलात्काराची प्रकरणे आढळून येत आहेत. न्यायालयाने सात वर्षांपूर्वी झालेल्या बलात्काराचा निकाल लावला आहे. आरोपीला वीस वर्षे कारावासाची शिक्षा आणि वीस हजार रुपये असा दंड ठोठावला आहे. या खटल्याचा निकाल कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. आस्टूरकर यांनी दिला. या प्रकरणात सरकारी वकील ॲड. कदंबिनी खंडागळे यांनी पीडित मुलीची बाजू प्रभावीपणे न्यायालयात मांडली. शंकर उर्फ राहुल वसंत पेटकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ए. एस. गंधास यांनी या प्रकरणाचा कसून तपास करून आरोपपत्र कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते.

अशी केली होती मुलीची फसवणूक

मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत राहत असलेली पीडित मुलगी घराजवळील सार्वजनिक ठिकाणच्या नळावर पाणी भरण्यासाठी गेली होती. पीडित मुलगी एकटीच असल्याचे पाहून नळाच्या बाजूला घर असणाऱ्या राहुलने मुलीला बिस्किट देतो असे सांगून स्वतःच्या घरी बोलावून घेतले. विशेष म्हणजे ही मुलगी राहुलला मामा असे संबोधत असल्याने ती राहुलच्या घरी गेली. यावेळी राहुलच्या घरात देखील कोणी नसल्याने मुलीला काही कळण्याच्या आतच त्याने मुलीवर बलात्कार केला. घडल्या प्रकाराने मुलगी घाबरली. हा प्रकार कोणाला सांगू नको म्हणून राहुलने पीडितेला दमदाटी केली. राहुलने केल्या प्रकाराबद्दल अस्वस्थ असलेल्या मुलीने घरी आल्यानंतर आई, वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पालकांनी मुलीला तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात राहुल विरुध्द तक्रार नोंदविण्यासाठी नेले. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून राहुल विरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायदा, बलात्कार कायद्याने गुन्हा दाखल केला होता. या घटनेचे आरोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर सात वर्षापासून न्यायालयात हा दावा सुरू होता.

हेही वाचा

Back to top button