मुंबई : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीची अडीच वर्षे आणि त्यापूर्वीच्या युती सरकारच्या पाच वर्षांच्या काळात या ना त्यानिमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये उडणार्या शाब्दिक चकमकी नित्याच्या झाल्या आहेत. त्यात मंगळवारी एका कथित टेलिफोन संभाषणाची भर पडली. राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात भाजप नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी 'अस्सलाम वालेकुम' म्हणत त्यांनी या संभाषणाची सुरुवात केली. त्यावर राजनाथ सिंह यांना ठाकरे यांनी ठणकावल्यानंतर राजनाथ यांनी 'जय श्रीराम' म्हटल्याचा किस्सा स्वतः ठाकरे यांनीच माजी आमदारांच्या बैठकीत सांगितला. या किश्श्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे.
'मातोश्री'वर सध्या बैठकांचा जोर सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पक्षाचे माजी आमदार, 2019 च्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार आणि विविध जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. माजी आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राजनाथ सिंह यांच्या त्या संभाषणाचा किस्सा सांगितल्याची चर्चा शिवसेना वर्तुळात सुरू झाली. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपने राजनाथ सिंह यांच्याकडे विविध पक्षांसोबत समन्वयाची जबाबदारी दिली होती. सिंह यांनी मुर्मू यांच्या पाठिंब्यासाठी फोन केला होता. तेव्हा संभाषणाची सुरुवात त्यांनी 'अस्सलाम वालेकुम'ने केली. यावर महाविकास आघाडीत गेलो, तरी हिंदुत्व सोडले नाही, असे सांगत मी राजनाथ यांच्या संबोधनावर आक्षेप घेतला. राजनाथ सिंह, तुम्ही हे लक्षात ठेवावे, असे उत्तर दिल्यानंतर 'जय श्रीराम' म्हणत त्यांनी संभाषण सुरू केले, असा किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
मात्र, राजनाथ सिंह यांच्या संदर्भातील या चर्चेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून भ्रम निर्माण करण्याचा अत्यंत दुर्दैवी प्रयत्न सुरू आहे. राजकीय प्रथा परंपरेला सोडून उद्धव ठाकरे यांनी केलेले हे भाष्य अयोग्य आहे. मुद्दाम असे काही बोलून सोशल मीडियामधून ते पाठवायचे. राजनाथ सिंहांसारख्या मोठ्या नेत्यांच्या संदर्भात अशी दंतकथा रचणे चुकीचे आहे. अडीच वर्षांपूर्वी अमित शहा यांच्या बाबतीत असेच अडीच वर्षे मुख्यमंत्री करणार असल्याचे असत्य कथन केले गेले. त्यांचे हे वक्तव्य अत्यंत अशोभनीय आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, राजनाथ सिंह यांच्या ऑपरेटरला कदाचित मेहबुबा मुफ्तींना फोन लावायचा असेल; कारण त्या त्यांच्या सहकारी होत्या. चुकून ऑपरेटरने उद्धव ठाकरेंना फोन लावला असेल. उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे तर ते खरेच असणार, असा टोलाही त्यांनी भाजपला हाणला.
उद्धव ठाकरेंनी टाळला प्रश्न
राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत केली. यावेळी आपले निवेदन करून ठाकरे निघत असताना पत्रकारांनी त्यांना 'राजनाथ सिंह आणि 'अस्सलाम वालेकुम'च्या संभाषणाबद्दल प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरे हे आपल्या निवेदनानंतर कोणताही प्रश्न न घेता 'मातोश्री'कडे रवाना झाले.
हेही वाचा