दादा कोंडके स्मृती सन्मान पुरस्काराने नवे बळ मिळाले! लोकरंग महोत्सवात कलावंतांनी व्यक्‍त केल्या भावना | पुढारी

दादा कोंडके स्मृती सन्मान पुरस्काराने नवे बळ मिळाले! लोकरंग महोत्सवात कलावंतांनी व्यक्‍त केल्या भावना

मुंबई : पुढारी वृत्तसेवा ज्येष्ठ हास्य अभिनेते आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या कामातून बहुआयामी व्यक्तिमत्व संपादन करणारे शाहीर दादा कोंडके यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार सर्वश्रेष्ठ असून नवे बळ देणारा आहे, असा आत्मविश्वास पाच नामवंत कलाकारांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केला.

मुंबईतील महाराष्ट्र सांस्कृतिक न्यासच्या वतीने बुधवारी दामोदर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सोहळ्यात, ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या सुषमा शिरोमणी, गीतकार किशोर कदम (सौमित्र), शाहीर नंदेश उमप, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते प्रसाद ओक यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल दादा कोंडके स्मृती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी या सर्व नामवंत कलाकारांनी आपल्या मनोगतातून दादा कोंडके यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

समारंभाला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या नामवंत गायिका पुष्पा पागधरे, ज्येष्ठ नाट्यकर्मी पुरुषोत्तम बेर्डे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या कलाकाराना पुरस्कार प्रदान करण्यात आला. दादा कोंडके यांच्या भगिनी स्व.लिलाबाई मोरे यांच्या प्रेरणेने हा समारंभ दरवर्षी पार पडतो. समारंभाला दादा कोंडके यांचे भाचे पद्माकर मोरे आणि सौ. माणिक पद्माकर मोरे, दादांचे नातू अ‍ॅड. अनिरुद्ध पद्माकर मोरे उपस्थित होते.

याप्रसंगी प्रवीण तरडे, प्रसाद ओक, शाहीर नंदेश उमप, किशोर कदम आणि सुषमा शिरोमणी या कलाकारांच्या चित्रपटांतील गाजलेल्या दमदार भूमिकांची चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. उपस्थित रसिकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात या भूमिकांना दाद दिली. प्रसाद ओक यांनी आपला पुरस्कार त्यांच्या गाजत असलेल्या आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर या चित्रपटाला समर्पित केला. संघटनेचे अध्यक्ष किसन जाधव, बाळा खोपडे, डॉ. सुनील हळुरकर, राजेश खाड्ये, नागेश भास्कर, माजी आमदार बाळासाहेब दांगट, गोपाळ शेलार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.न् यासचे कार्यकारी विश्वस्त संतोष परब म्हणाले, शाहीर दादा कोंडके यांनी आपले व्यक्तिमत्त्व शाहीरी, अभिनय, गीतलेखन, दिग्दर्शन आणि निर्माता या पाच उत्कृष्ट गुणांवर अलौकिकमयी केले. ही गोष्ट लक्षात घेऊन पाच विभागांतून पुरस्कारासाठी दिग्गज कलाकारांची निवड करण्यात आली.

बुधवारी या पुरस्कार लोकमहोत्सवाची सांगता झाली. लोकरंग महोत्सवाची संकल्पना सायली परब यांची होती. या कार्यक्रमात पराग चौधरी आणि अभिनेत्री वर्षा संगमनेर यांनी दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार, सोंगाड्या, एकटा जीव सारख्या अनेक गाजलेल्या गाण्यावर नृत्य करुन धमाल उडवून दिली. तर गौरव दांडेकर, समीर लाड, ब्रह्मनंदा पाटणकर, वंदना निकाळे या गायकांनी आपल्या सुश्राव्य आवाजात दादा कोंडके यांच्यावर चित्रित केलेली गाणी गाऊन समारंभ सजीव केला. तीन दिवसाच्या संपूर्ण महोत्सवातील कार्यक्रमांना संगीतकार मनोहर गोलांबरे यांचे संगीत संयोजक लाभले. नृत्य दिग्दर्शन अमित घरत यांनी केले.

हेही वाचा

Back to top button