सेनेचा संसदीय पक्षही शिंदे गटाच्या मार्गावर? 12 खासदार फुटणार असल्याची कुणकुण | पुढारी

सेनेचा संसदीय पक्षही शिंदे गटाच्या मार्गावर? 12 खासदार फुटणार असल्याची कुणकुण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे 40 आमदार फोडून जवळजवळ 80 टक्के विधिमंडळ पक्ष सोबत घेत मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्या गटात आता सेनेचे 18 पैकी 12 खासदार दाखल होऊ शकतात. ही कुणकुण लागताच आपला संसदीय पक्ष वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरसावले असून, बुधवारी त्यांनी खा. भावना गवळी यांची मुख्य प्रतोद पदावरून हकालपट्टी केली आणि या पदाची सूत्रे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या हाती दिली.

शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी यासंदर्भातील पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले. या निर्णयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हे ठाण्यात समोरासमोर येण्याची शक्यता आहे. या नियुक्तीच्या माध्यमातून शिवसेनेनेे विचारे यांना दिल्याचे मानले जाते. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईनंतर शिवसेना नेतृत्वाला भाजपसोबत जाण्याचा आग्रह यवतमाळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांनी धरला होता. गवळी यांनीही भाजपशी युती करण्याचे समर्थन ऐन बंडाच्या काळात केले होते. बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणीही गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठ्वून केली होती. गवळी यांचा एकूण कल लक्षात घेऊन उद्धव यांनी त्यांना प्रतोद पदावरून हटवण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

12 खासदार फुटणार?

माजी 22 आमदार आणि 18 पैकी 12 खासदार शिंदे गटात येत असल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केल्याने शिंदे गट शिवसेने शिवसेनेला दुसरा धक्‍का देणार असल्याचे चित्र आहे. गुलाबरावांनी खासदारांची नावे घेतली नाहीत. मात्र, आपल्या मतदार संघाच्या दौर्‍यात चार नाराज खासदारांशी आपण चर्चा केल्याचे गुलाबराव म्हणाले. पुढारीला मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदे-कल्याण, सदाशिव लोखंडे-शिर्डी, भावना गवळी-यवतमाळ, राहूल शेवाळे-दक्षिण मुंबई, राजेंद्र गावीत-पालघर, हेमंत गोडसे-नाशिक यांचा या नाराज खासदारांमध्येे समावेश आहे. यापैकी शेवाळे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार द्रौपदी मूर्मू यांनाच पाठिंबा द्या, अशी मागणी करणारे पत्र उद्धव यांना पाठवले. अशी पद्धत शिवसेनेत नाही. त्यामुळे शेवाळे यांच्या पत्राचा अर्थ ते सेनेच्या विरोधात भाजपकडे निघाले असा काढला जात आहे.

आणखी किती हकालपट्ट्या? : मुख्यमंत्री

संसदेत भावना गवळी यांची प्रतोद पदावरून हकालपट्टी करून राजन विचारे यांची नियुक्ती करण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आणखी किती लोकांची हकालपट्टी करणार, असा प्रश्नही त्यांनी केला. आम्ही शिवसेना सोडलेली नाही,अजूनही आम्ही शिवसेनेतच आहोत, विधासभा अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. खा. राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्राचेही समर्थन करीत शिंदे म्हणाले, द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाची संधी मिळणे हा आदिवासींचा बहुमान ठरेल.

अडसूळांचा धक्‍का

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. त्यावर शिवसेनेकडून कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. सीटी को-ऑप. बँकेच्या 980 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अडसूळांची ईडी चौकशी सुरू आहे. भाजपशी जुळवून घ्या, असा त्यांचाही सूर होता. अर्थात अडसूळ अद्याप सेनेबाहेर पडलेले नाहीत.

फूट ठरणार कायदेशीर

शिंदे गटाला फूट वैध ठरवण्यासाठी दोन तृतीयांश आमदार पाठीशी येण्यास वाट बघावी लागली. तशी स्थिती सेनेच्या संसदीय पक्षाची नाही. शिवसेनेचे 18 खासदार आहेत. त्यापैकी 12 खासदार शिंदे गटापर्यंत पोहोचले असे गृहित धरले तर ही संख्या एकूण खासदारांच्या दोन तृतीयांश ठरते. म्हणजे सेनेतून बाहेर पडल्यास त्यांचा वेगळा गट वैध ठरेल.

हेही वाचा

Back to top button