कुख्यात गुंड दीपक ऊर्फ कोत्या सांगळेची पत्नीकडून हत्या | पुढारी

कुख्यात गुंड दीपक ऊर्फ कोत्या सांगळेची पत्नीकडून हत्या

कुर्ला ; पुढारी वार्ताहर : कुख्यात गुंड दीपक ऊर्फ कोत्या जगन्नाथ सांगळे(28) याच्या गुन्हेगारीला त्रासलेल्या त्याच्या पत्नीने आपल्या दोन बहिणी, मेव्हणे तसेच शेजारच्यांच्या मदतीने त्याची हत्या करून मृतदेह घरात पुरला. ही धक्कादायक घटना तब्बल दोन महिन्यांनंतर उघडकीस आली आहे.

याप्रकरणी व्ही. बी. नगर पोलिसांनी त्याची पत्नी सरस्वती सांगळे(21), मेव्हणी मनीषा आचारी (25), मेव्हणा आनंद गौतम (22), दुसरा मेव्हणा आदीत गौतम (19) आणि शेजारी विशाल कराडे (25), किशोर साहू (24), रितीक विश्वकर्मा (22) या सात जणांना अटक केली.

कुख्यात गुंड दीपक ऊर्फ कोत्या 15 जूनपासून हरवला होता. याबाबत दीपकच्या बहिणीने त्याची पत्नी सरस्वती हिला वारंवार त्याच्या बद्दल विचारले असता, तिने संशयास्पद उत्तरे त्यांना दिली. त्यामुळे दीपकची बहीण संगीता सांगळे हिने 21 जून रोजी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार नोंदवली. त्या तक्रारीनुसार, व्ही.बी. नगर पोलिसांसह गुन्हे कक्ष पाच देखील याचा तपास करत होते. गुन्हे शाखा कक्ष पाच ने या प्रकरणी मृत दीपक ऊर्फ कोत्या भाईचा मेव्हणा आदीतला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली.

त्याने दीपकची पत्नी आणि तिची बहीण सरस्वती, दुसरी बहीण मनीषा, मोठा भाऊ आनंद तसेच कोत्या भाईच्या जाचाला कंटाळल्याने शेजारी विशाल, किशोर आणि रितीक यांच्या मदतीने त्याला आधी गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून ठार करून बाजुलाच असलेल्या एका घरात पुरल्याची कबुली दिली.

व्ही. बी. नगर पोलिसांनी तपास करून या सातही आरोपींना बेड्या ठोकल्या.तसेच न्यायालयाच्या परवानगीने फॉरेन्सिक डॉक्टरांची टीम तसेच इतर आवश्यक यंत्रणांचा उपयोग करून शनिवारी (दि.21) तीन ते चार तास त्या घरात खोदकाम करून दीपकचा मृतदेह बाहेर काढला.

* दीपकला जेवणात गुंगीचे औषध दिल्यानंतर धारधार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. त्यानंतर त्याला एक गोणीत भरून घरातच पुरले. त्या जागेवर सिमेंटचा कोबा करण्यात आला.

* दीपक सांगळे हा परिसरात कोत्या भाई म्हणून ओळखला जायचा. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. विनोबा भावे नगर पोलिसांनी त्याला तडीपार करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली होती.

* दीपकची बहीण संगीताने दीपकची पत्नी आरोपी सरस्वतीवर संपत्तीच्या वादातून तसेच अनैतिक सबंधातून तिने ही हत्या केल्याचा आरोप केला आहे. आरोपींना स्थानिक न्यायालयाने 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Back to top button