पोलीसाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, डोंबिवलीत खाकीला कलंक | पुढारी

पोलीसाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, डोंबिवलीत खाकीला कलंक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : पोलीसाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग : सुशिक्षितांची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलने नारी-अबलांची रक्षा करण्याऐवजी तिच्या इज्जतीवर हात टाकल्याचा संतापजनक प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
कॉन्स्टेबल (शिपाई) म्हणून कार्यरत असलेल्या एका 34 वर्षीय पोलिसाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी हा कॉन्स्टेबल कार्यरत असलेल्या त्याच पोलिस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या पोलिसावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. सतीश कर्ले असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे.

पोलीसाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कॉन्स्टेबल सतीश कर्ले डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात गेल्या 4 वर्षांपासून कार्यरत आहे. हा कॉन्स्टेबल नांदीवली परिसरात राहत आहे. तो राहत असलेल्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने या कॉन्स्टेबलविरोधात विनयभंग केल्याची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री दाखल केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
गुरुवारी दुपारच्या सुमारास ही मुलगी सदर इमारतीच्या जिन्यातून जात होती. इतक्यात या कॉन्स्टेबलने मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकारामुळे भेदरलेल्या मुलीने तिच्या बाबतीत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला.
त्यानंतर या मुलीच्या जबानीवरून पोलिसांनी कॉन्स्टेबल सतीश कर्ले याच्या विरोधात भादंवि कलम 354, 354 (अ) सह लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याचे कलम 10 व 12 अन्वये शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास गुन्हा दाखल केला.

कॉन्स्टेबल सतीश कर्ले याला अटक

सदर मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर कॉन्स्टेबल सतीश कर्ले याला अटक करण्यात आली. गुन्हा दाखल होताच पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी कॉन्स्टेबल सतीश कर्ले याच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.
कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कॉन्स्टेबल सतीश कर्ले याची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे. येत्या रविवारी रक्षाबंधनाचा सण आहे. नारी-अबलांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळण्याऐवजी पोलिसाने त्याच्या वर्दीला कलंक लावण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे या घटनेनंतर डोंबिवलीत एकच खळबळ माजली आहे.
हे ही वाचलं का?

Back to top button