मुंबईसह कोकणात पावसाचे धूमशान ; चार नद्या इशारा पातळीवर, कोकणला पुन्हा रेड अलर्ट | पुढारी

मुंबईसह कोकणात पावसाचे धूमशान ; चार नद्या इशारा पातळीवर, कोकणला पुन्हा रेड अलर्ट

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचे धूमशान सुरू असून, तुंबलेल्या मुंबईत मंगळवारी वाहने रखडली, लोकल मंदावली आणि पावसाच्या रुद्रावतारामुळे शाळांना सुट्टी द्यावी लागली. कोकणात जगबुडी, वाशिष्टी, शास्त्री, जानवी या नद्यांनी इशारा पातळीही ओलांडली असून, संपूर्ण कोकणात 3500 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यातच आता मुंबईसह कोकणला अतिमुसळधार रेड अलर्ट देण्यात आला आहे.

गुजरात ते महाराष्ट्राची किनारपट्टी आणि पूर्व राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाल्यामुळे कोकणसह कोल्हापूर व सातारा या भागात अतिमुसळधार (रेड अलर्ट) पावसाचा इशारा देण्यात आला असून, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 6 ते 8 जुलै हे तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

या पावसाने सर्वात हाहाकार उडवला तो पूर्व उपनगरांमध्ये. कुर्ला आणि चेंबूरमध्ये पाणीच पाणी झाले आणि ते पोस्टल कॉलनीत शिरल्याने तेथील रहिवाशांना घरे-दारे सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला.

कोकणात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आणि कोकणच्या बहुतांश भागात गावागावांत पुराचे पाणी शिरले आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातही अतिवृष्टी झाली आहे.

कोकणात स्थलांतर

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्यांमध्ये प्रचंड पाऊस सुरू असून, एकट्या रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीतील 1543 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तळा शहरात गेल्या चोवीस तासांत मंगळवारी सकाळी 8.30 वाजता सर्वाधिक 245 मिमी पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यात याच काळात सरासरी 230 मिमी पाऊस कोसळला. याचा अर्थ वर्षभराच्या एकूण पावसापैकी 22.46 टक्के पाऊस कोसळला.

रेड अलर्ट : पालघर (8 जुलै), रायगड (6 ते 8 जुलै), रत्नागिरी (6 ते 8 जुलै), कोल्हापूर (6 ते 8 जुलै), सातारा (6 ते 8 जुलै).

ऑरेंज अलर्ट : पालघर (6 ते 9 जुलै), ठाणे (6 ते 9 जुलै), मुंबई (6 ते 9 जुलै), रायगड (9 जुलै), सिंधुदुर्ग (6 ते 9 जुलै), नाशिक (6 ते 9 जुलै), पुणे (6 ते 9 जुलै), कोल्हापूर (9 जुलै), सातारा (9 जुलै).

यलो अलर्ट : धुळे (8 जुलै), नंदुरबार (6 ते 9 जुलै), जळगाव (8 जुलै), नगर (8 जुलै), औरंगाबाद (6 व 7 जुलै), जालना (6 व 7 जुलै), परभणी (6 व 7 जुलै), हिंगोली (6 व 7 जुलै), नांदेड (6 व 7 जुलै).

परशूराम घाट बंद

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला पावसाने मोठा फटका दिला आहे. परशुराम घाटात दोनदा दरड कोसळल्याने हा घाट रेड अलर्ट असेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. दुसरीकडे चिपळूण-कराड रोडवर दरड कोसळल्याने काही काळ हा मार्ग बंद होता. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मार्ग, कॉजवे, पूल पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी वीज व दूरध्वनी वाहिन्यांवर झाडे पडल्याने वीज व संपर्क सेवाही ठप्प झाली आहे.

7 व 8 जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज

मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सात व आठ जुलैला मुंबई शहर व उपनगरात अतिवृष्टीचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

तेरा पथके तैनात

विविध जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची (एसडीआरएफ) 11 पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच बेस स्टेशनवर ‘एनडीआरएफ’ची 9 आणि ‘एसडीआरएफ’ची 4 अशी एकूण 13 पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा

Back to top button