शिवसेना संपविण्यासाठी भाजपने दाढीवाला चेहरा पुढे केला : उद्धव ठाकरे | पुढारी

शिवसेना संपविण्यासाठी भाजपने दाढीवाला चेहरा पुढे केला : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि.५) शिवसेना महिला जिल्हा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी शिवसेना भवन येथे संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय परिस्थितीला उद्देशून भाषण केलं.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, काल शंभर टक्के बांधव होते, आज समोर शंभर टक्के भगिनी आहेत. अत्यंत प्रामाणिक आणि मोकळेपणाने सांगतो की शक्ती मिळाल्याचा अनुभव आला आहे. तुम्ही सर्वजणी अमाप कष्ट करताय, तुमच्या भावना बोलता आहात, बहुतेक जणींच्या मला डोळ्यात अश्रू दिसत आहेत. मी असा मध्ये उभा आहे, एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातलं विकृत हसू आणि दुसऱ्या बाजूला निष्ठावंत शिवसैनिकांच्या डोळ्यातले अश्रू यातूनच मला मार्ग काढायचा आहे. पण मार्ग तर नक्की काढणारच.

पुढे ठाकरे म्हणाले, मला खंत एका गोष्टीची आहे की, 25-30 वर्ष सोबत राहिलो, ते आपले एकदम कट्टर शत्रू झाले. 25-30 वर्ष ज्यांच्या विरुद्ध लढलो ते काँग्रेस, राष्ट्रवादी आपल्या सोबत आहेत. पण ज्यांच्यावर पक्षाची धुरा सोपवली होती त्यांनीच पाठीत वार केला. हेच माझ्यासाठी लाजिरवाणे आहे. सध्या ज्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं सांगत आहेत ते अजून सोबत आहेत. पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दगा दिला.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, तुमची परिस्थिती फारच वेगळी असते. सगळ्याचजणींची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. तुम्हाला घर-दार, मुलं-बाळ, सगळ्या गोष्टी सांभाळून निष्ठेने काम करावं लागतं आणि तुम्ही ते करतायत. पण तुम्हा महिला शिवसैनिकांना आजपर्यंत काहीच दिलं नाही. काहीवेळा हा विचार येतो की 50 टक्के आरक्षणापेक्षा गेल्या वेळेस 100 टक्के महिलांना उमेदवारी दिली असती तर कोणी हरामखोरी केलीच नसती.

रिक्षाचा ब्रेक फेल

उद्धव ठाकरे म्हणाले, विधानपरिषदमध्ये दोन्ही जागा जिंकून येतील असं म्हणत होतो, ते निवडून देखील आले. पण 12 मते त्यांनी आधीच बाजूला काढून ठेवली होती. मग यांचं कटकारस्थान कधीपासून सुरू होतं? काल ते विधानसभेत गुपीत खुललं. उपमुख्यमंत्री त्यांना सांगत होते थांबा, थांबा… गाडीचा ब्रेक फेल झालेला, गाडी थांबते कशाला… रिक्षाचा ब्रेक फेल… त्यावेळेला तीन चाकी सरकार बोलायचे आता तीन चाकी चालवणारा त्यांचा ड्रायव्हर… आता चालवा सरकार, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केल्या.

अश्रूंची किंमत त्यांना मोजावी लागणार

शिवसेना प्रामुखांच्या मुलाला खुर्चीतून खाली खेचलं, त्यांचं सुख लख्ख लाभो, किती पर्यंत राहील बघू. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या अश्रूंची किंमत त्यांना मोजावी लागणार. 2019 साली ठरल्याप्रमाणे केलं असतं तर फुकटमध्ये तुम्हाला केलं असतं. एवढा खर्च कशाला केला? का माझ्या आमदारांना पळवलं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला केला.

भाजपचा शिवसेना संपवण्याचा डाव आहे. शिवसैनिकांना शिवसैनिकांशी लढवायचं आहे. यांना शिवसेना नकोय, नुसती शिवसेना फोडा नाही तर शिवसेना संपवा हा त्यांचा डाव आहे. त्यासाठी हा दाढीवाला चेहरा पुढे केला. हे फुटुन गेलेल्यांना देखील माहिती नाही. त्यांना दाबून ठेवलं आहे. त्यांचा गळा आवळून ठेवला आहे. सत्तेचा ताबा भाजपच्याच हातात आहे. काल बघितलं ना? पुढ्यातून माईक खेचला. मी मुख्यमंत्री असताना असं कधी झालं नाही. पण काल बघितलं ना. त्यांच्या पुढ्यातून माईक खेचला, त्यांना देखील कळालं नाही. आता माईक खेचलाय उद्या काय खेचतील ते बघा, असे ही ठाकरे म्हणाले.

ईडीचा धाक

काय झाडी… काय ईडी… आनंदात आहेत… ईडीच्या धाडीच्या धाक दाखवून त्यांना इथून घेऊन गेलेत. आता बघा काय होतं ते. कळेलच त्यांना यापुढे. मी 19 जून 1966 च्या मानसिकतेचा आहे. तुम्ही तयार आहात का? तेव्हा धनुष्यबाण देखील नव्हतं. त्या मानसिकतेतुन आपल्याला लढायचं आहे.

तुम्हाला बघून मला हत्तीपेक्षा हजारो वाघांचं बळ आलं आहे. पुन्हा एकदा तेजाकडे वाटचाल करूया. याच्यापुढे पहिला मान महिलांना द्यायचा. तुम्ही या राजकारणाकडे लक्ष देऊ नका, त्याला तोंड द्यायला मी सज्ज आहे. तुम्ही निवडणुकांकडे लक्ष ठेवा. या निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत. तुम्हाला या गद्दारांच्या विरोधातील रागाचा निखारा फुलवायचा आहे. कोणत्याही निवडणुका येउद्या यांना भुईसपाट करायचं आहे. या मातृशक्तीला मनापासून वंदन करतो.

हेही वाचा

Back to top button