भाजपचा निर्णय डोळ्यांत अंजन घालणारा : मुख्यमंत्री | पुढारी

भाजपचा निर्णय डोळ्यांत अंजन घालणारा : मुख्यमंत्री

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  भाजपकडे 115 आणि आमच्याकडे 50 आमदार असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मला काहीही नको होते. मात्र, भाजपने माझा सन्मान केला. माझ्या वैचारिक भूमिकेला पाठिंबा दिला. भाजपचा हा निर्णय डोळ्यांत अंजन घालणारा आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला.

रविवारी विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली. यानिमित्ताने नार्वेकर यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. गेल्या काही दिवसांत ज्या घटना घडल्या, त्याची नोंद देशपातळीवर घेतली गेली. सर्वसाधारणपणे आमदार विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात जातात. मात्र, इकडे माझ्यासह 9 मंत्री सत्तेतून पायउतार झाले. समोर मोठमोठे नेते असतानाही 50 आमदारांनी बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे यांंच्या सैनिकावर विश्‍वास टाकला. त्यांना हलविण्याचे प्रयत्न झाले. पण एकही आमदार हलला नाही, असे शिंदे म्हणाले.

आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे सांगण्यात आले. मी त्यांना जे संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगा. मी त्यांना विशेष विमानाने पाठवेन, असे सांगितले. माझ्यासोबत आलेल्या आमदारांना मी कोणतीही जबरदस्ती केली नाही, असे शिंदे यांनी सभागृहात सांगितले. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले.
राहुल नार्वेकर सर्वांना समान न्याय देतील!

राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्‍चितच समान न्याय देतील, असा विश्‍वास व्यक्‍त करून विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मांडला.
नार्वेकर सभागृहाची प्रतिष्ठा

उंचावतील ः फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नार्वेकर यांचे अभिनंदन करताना नार्वेकर हे सर्वांत तरुण अध्यक्ष असून ते कायद्याचे उत्तम जाणकार आहेत, असे सांगितले.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाला मोठी परंपरा लाभलेली आहे. ज्यांनी ज्यांनी या अध्यक्षपदावर कार्य केले आहे, त्यांना देशपातळीवर नावाजले गेले. ही जबाबदारी नार्वेकर नक्‍कीच पूर्ण क्षमतेने निभावून नेतील आणि सभागृहाची प्रतिष्ठा उंचावण्याचे कार्य करतील. यापूर्वीच्या सर्व अध्यक्षांनी उत्तम काम केले असून हीच परंपरा नार्वेकर यांच्या कालावधीत पुढे सुरू राहील. राज्याच्या सर्व नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची संधी त्यांना मिळाली असून कोणत्याही अडचणी, प्रश्‍न सोडविण्याची क्षमता या सभागृहात आहे. त्यामुळे दोन्ही बाजू समजून घेऊन त्या विषयाला न्याय देण्याचे कार्य ते करतील,अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्‍त केली.

विधानसभा अध्यक्षपदाला गौरवशाली परंपरा असून, ती कायम ठेवत नार्वेकर यांच्या कार्यकाळात लोकहिताचे निर्णय घेऊन राज्याच्या विकासाला गती मिळेल, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नार्वेकर यांना शुभेच्छा देऊन सभागृहात राज्याच्या सर्व प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. त्याचवेळी थोरात यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राज्यपालांनी परवानगी दिली नाही. आता त्यांचा रामशास्त्री प्रभुणे बाणा जागा झाला. आता त्यांनी आम्ही विधान परिषदेसाठी 12 सदस्यांची शिफारस मान्य करावी, असेही थोरात म्हणाले.

Back to top button