किरीट सोमय्या यांच्या वाशिम दौर्‍यात राडा | पुढारी

किरीट सोमय्या यांच्या वाशिम दौर्‍यात राडा

वाशिम : पुढारी वृत्तसेवा

मालेगाव-रिसोड महामार्गाचे बंद पडलेले काम आणि बालाजी पार्टिकल बोर्डची पाहणी करण्यासाठी आले असता भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या वाहनावर शाईही फेकली. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते भिडले. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

सोमय्यांनी शुक्रवारी वाशिम दौरा केला होता. बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्यासाठी ते जात होते. त्यावेळी देगाव फाट्यावर शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवत वाहनावर शाई फेकली आणि दगडफेक केली. सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सोमय्यांच्या सोबत कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी, भाजप नेते राजू पाटील राजे हेही होते. सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने जमावाने मोठी गर्दी केली होती. मात्र पोलिसांना ही गर्दी पांगवण्यासाठी तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर सोमय्या पुढे दौर्‍यासाठी निघून गेले.

Back to top button