उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे "ओबीसी" आरक्षणाबाबत मोठे विधान | पुढारी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे "ओबीसी" आरक्षणाबाबत मोठे विधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओबीसी आरक्षणाबाबत तातडीने त्रुटीरहीत अहवाल तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असून सदर अहवाल सर्वोच्य न्यायालयात सादर करू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत पहिली बैठक घेतली. यावेळी ओबीसी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सर्वोच्य न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत याचिका आहे. राज्य सरकारने ओबीसी बाबतचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्रुटीरहीत अहवाल तातडीने सादर करण्यात यावा. हा अहवाल योग्य पद्धतीने सादर केला तर ओबीसीना राजकीय आरक्षण बहाल करता येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मेट्रो शेड आरे कॉलनीतच…

मेट्रोची शेड ही आरे कॉलनीत होईल. या शेडचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आरेतील मेट्रो शेड हलवण्याचा आधीच्या सरकारचा निर्णय चुकीचा होता. त्यांनी या विषयावर इगो केला. त्यामुळे काम रखडले. नवीन जागा मिळविण्यासाठी अनेक वर्षे गेली असती. पण आम्ही आता तातडीने काम मार्गी लावू आणि मुंबईकरांसाठी मेट्रो सेवा लवकर सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक…

आघाडी सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने करावी, अशी तरतूद केली आहे, याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ही निवडणूक आवाजी मतदानाने होईल. यासाठी पक्षाचा व्हीप आमदारांना बंधनकारक नसतो. त्यामुळे आमचा अध्यक्ष सहज निवडून येईल, असे ते म्हणाले.

आधीपासून सरप्राइज असेल, असे सांगत होतो….

मी आधीपासून मिडीयाला सरप्राइज असेल, असे सांगत होतो. कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनणार होते. हेच ते सरप्राइज होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिंदे हे मुख्यमंत्री होणार होते, असे ठरले होते. तर मी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारणार होतो. पण पक्षाने मला मंत्रिमंडळात सामील होण्याचे दुसरे सरप्राइज दिले. ते दुसरे सरप्राइज मला माहीत नव्हते, असे त्यांनी नमूद केले.

धोकादायक इमारतींना नोटीस देणार

कोकणात दरड कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. धोकादायक इमारतींबाबत आत्ताच काळजी घेतली तर, मोठे नुकसान होणार नाही. तसेच धोकादायक इमारतीत राहत असलेल्या लोकांनी तात्पुरत्या कालावधीसाठी स्थलांतराचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button