विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांची नावे चर्चेत | पुढारी

विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांची नावे चर्चेत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे आता या पक्षाकडे केवळ १६ आमदार उरले आहेत. ‘शिंदेशाही’ सुरू झाल्यानंतर यातील काही आमदार या गटाच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संख्याबळ नसतानाही विधान परिषदमध्ये विरोधी पक्षनेते पद देण्याची पद्धत विधानसभेमध्ये अंगीकारली जाणार नाही. विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेला भाजप आता सत्तेत गेला असल्यामुळे विरोधकांमध्ये आमदारांची संख्या असलेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार आहे.

राज्यातील इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे सर्वाधिक अनुभवी नेते आहेत. तगडा अभ्यास आणि प्रशासनाकडून कामे करून घेण्याची अनोखी पद्धत यांच्याकडे जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून अनेक नेत्यांची नावे समोर दिसत असली तरी सध्या अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांना सर्वाधिक पसंती आहे.

आपल्या विशेष ढंगातून संवाद साधत ग्रामीण भाषिकांना आपलेसे करणारे अजित पवार, प्रतिस्पर्ध्याला कुशलतेने चिमटे, टोमणे मारणारे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीतील फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे धनंजय मुंडे यांची विरोधी पक्षनेते पदासाठी नावे चर्चेत आहेत. तर ही नावे चर्चेत असली तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यापैकी एकाच्या गळ्यात विरोधी पक्ष नेते पदाची माळ घालतात की, भाजपाप्रमाणे धक्का तंत्राचा वापर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button