मोठी बातमी : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश

मोठी बातमी : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : एकनाथ शिंदे यांच्या गटाने पाठिंबा काढून घेतल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. याच दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी राज्य विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी राज्य विधानसभा सचिवांना पत्र लिहिले आहे. उद्या सकाळी ११ ते ५ दरम्यान विशेष अधिवेशन होणार असून यादरम्यान ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, गुवाहाटीत असलेले बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आम्ही उद्याच मुंबईत परतणार असल्याचे जाहीर केले आहे. बहुमत चाचणीसाठी आमदार उद्या मुंबईत येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी आज गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व आमदारांना घेऊन बहुमत चाचणीसाठी जाणार असल्याचे सांगितले.

अल्पमतात आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा, अशी मागणी करणारे पत्र भारतीय जनता पक्षाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले होते. परिणामी, गेला आठवडाभर सुरू असलेल्या सत्तानाट्याचा क्लायमॅक्स आता समीप आला आहे. शिवसेनेेतील बंडानंतर सुरू झालेल्या राजकीय नाट्यात नवव्या दिवशी भाजपने एन्ट्री घेतली आणि सरकारला शक्‍तिपरीक्षेचे आव्हान देण्यासाठी राजभवन गाठले. आता विधिमंडळ प्रशासनाने शक्‍तिपरीक्षेची तयारीदेखील सुरू केली आहे.

मंगळवारी रात्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशीष शेलार यांच्यासह भाजप आमदारांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती.

या भेटीनंतर फडणवीस यांनी राजभवनाबाहेर पत्रकारांना सांगितले की, शिवसेनेचे 39 आमदार राज्याबाहेर गेले आहेत. त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहायचे नाही, असा पवित्रा घेतला आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत उरलेले नाही. त्यामुळे शरकारला तातडीने बहुमत चाचणी घ्यायला सांगावे. असे पत्र आम्ही राज्यपालांना दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांचा दाखलाही आम्ही पत्रात दिला आहे. त्यावर राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील, असा आम्हाला विश्‍वास आहे.

शिवसेना नेते माजी मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंडखोरी करत सुरतमार्गे गुहाटीला मुक्काम ठोकला. बघता बघता त्यांना शिवसेनेचे 39 आणि 11 अपक्ष मिळून 50 आमदार जाऊन मिळाले. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवणारग्या नोटीसा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बजावताच बंडखोर गट सर्वोच्च न्यायालयात गेला. या नोटीसीला उत्तर देण्याची मुदत 12 जुलैपर्यंत वाढवून देत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. मात्र, या दरम्यान बहुमताची चाचणी घेऊ नका, असे कोणतेही आदेश न्यायालयाने दिले नाहीत. पुढील सुनावणीपर्यंत काही बेकायदेशीर घडल्यास तुम्ही पुन्हा आमच्याकडे येऊ शकता, इतकेच न्यायालयाने शिवसेनेला सांगितले. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे बहुमताची परीक्षा घेण्याचा मार्ग खुला असल्याचे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्‍त केले आणि संपूर्ण कायदेशीर खातरजमा करून भाजपने मविआ सरकारला शक्‍तीपरीक्षेचे आव्हान देण्याचे ठरवले.

आधी दिल्‍लीत खलबते

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीड तासचर्चा केली. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी हे उपस्थित होते. एकनाथ शिंदे गटाला कसा पाठिंबा देता येईल, याविषयी मार्गदर्शन करणारे टिपण त्यांनी सादर केले. राज्यपालांकडे अविश्‍वास ठराव मांडण्यासंबंधी चर्चा झाली. त्यासंबंधीच्या कायदेशीर मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.

त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. या सर्व चर्चा म्हणजे भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी चालवलेल्या हालचाली असल्याचा अंदाज सगळ्यांनाच आला होता तो खरा ठरला. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निकालानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाला बळ मिळाले आणि कायदेशीर बाजू तपासल्यानंतर आता भाजपच्या हालचालींना वेग आला.शिदे गटासोबत सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर या गटाला किती मंत्रिपदे द्यायची, यासंबंधी देखील फडणवीस यांनी नड्डा यांच्यासोबत चर्चा केल्याचे कळते.

फडणवीस यांच्या नेतृत्वात बनणार्‍या संभाव्य मंत्रिमंडळ रचनेविषयीही यावेळी चर्चा झाल्याचे समजते. शिंदे गटाने 13 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपद अशी मागणी केल्याचे कळते.

बहुमताचा आकडा बदलणार

महाविकास आघाडीच्या शक्‍तीपरीक्षा कशी होणार याबद्दल अटकळी बांधल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 39 बंडखोर आमदार गैरहजर राहिल्यास बहुमताचा आकडा 145 ऐवजी 125 वर येऊ शकतो.

अशा परिस्थितीत भाजप आणि भाजप समर्थक मिळून 113 सदस्य होतात. बविआचे 3, शेकापचा 1, अपक्ष 10 आणि इतर 2 असे 129 सदस्यांचे पाठबळ भाजपकडे जमा झाले आहे. शिंदे गट गैरहजर राहिल्यास भाजप बहुमत सिद्ध करू शकेल.

शिंदे गट मतदानाला हजर राहिल्यास काय होईल याचा अंदाज मात्र लावणे कठीण झाले आहे. प्रत्यक्ष मतदानात शिवसेनेचे किती बंडखोर शिंदे यांच्या आदेशानुसार मतदान करतील आणि किती बंडखोर पुन्हा शिवसेनेला जाऊन मिळतील यावर ठाकरे सरकारचे भवितव्य अवलंबून राहील.

देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटल्यानंतर तिकडे गुवाहाटीत शिंदे गटाची लगेच बैठक झाली. अधिवेशनाची तारीख राज्यपालांनी निश्‍चित होताच मुंबईत परतण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news