मुंबई; पुढारी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मगळवारी (दि. २८) रात्री उशिरा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी घ्यावी या मागणीचे पत्र राज्यपाल यांना दिले. आता राज्यपाल यावर कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करुन आपल्यासोबत ४० हून अधिक आमदारांना गुवाहटी येथे नेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठी खिंडार पडली आहे. या राजकीय भूकंपानंतर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. हे सर्व राजकीय नाट्य २२ जून पासून राज्यात रंगले आहे. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांची फैरीच सुरु झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांकडे मागणी
या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपने आता पर्यंत कोणतीही भूमिका घेतली नव्हती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्ली गाठत भाजचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेत महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी रात्री राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत राज्यातले महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून या सरकारच्या बहुमताची चाचणी घ्यावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
शिवसेनेतील एका गटाने बंड केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. हे सरकार आपले बहुमत सिद्ध करु शकणार नाही. म्हणून आम्ही आज राज्यपाल यांची भेट घेतली. तसेच हे सरकार अल्पमतात आले असून त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावे अशा विनंतीचे पत्र आम्ही राज्यपाल यांना दिले आहे. तसेच या संदर्भात सर्वोच्च न्यायालाचे विविध आदेश आहेत त्याचा ही उल्लेख आम्ही या पत्रात केला आहे. राज्यातील परिस्थीती पाहून राज्यपाल आमच्या विनंतीस मान देऊन योग्य तो निर्णय घेतील.
- विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस