औषधात पैसे खाणाऱ्यांकडे गोमूत्र? ; नारायण राणे यांची शिवसेना नेतृत्वावर टीका | पुढारी

औषधात पैसे खाणाऱ्यांकडे गोमूत्र? ; नारायण राणे यांची शिवसेना नेतृत्वावर टीका

मुंबई, पुढारी ऑनलाईन : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील कलगीतुऱ्याला आता प्रारंभ झाला आहे. राणे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईतू असून त्यांनी गुरुवारपासून शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही.

जनआशीर्वाद यात्रा काढली म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करणारे सरकार अपयशी आहे. औषधात पैसे खाणाऱ्यांची गोमूत्र हातात धरायची लायकी नाही.

संजय राठोडसारख्यांचे गुन्हे मोजत बसलेल्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आम्हाला फिकीर नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेतृत्वावर केली.

मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई महापालिकेत सत्तापरिवर्तन हमखास होणार.

गेल्या ३२ वर्षांत मुंबई बकाल केली असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘ पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे.

नवनिर्वाचित मंत्र्यांना जनतेपर्यंत जाण्याचे आदेश त्यांनी दिले. जेणेकरून आम्ही त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊ.

या माध्यमातून गेल्या सात वर्षांत देशात प्रगतीसाठी जी कामे केली तेही सांगण्याचा प्रयत्न केला. ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षात भारत महासत्तेकडे वाटचाल करणारा असावा.

देशात निर्यातीत अग्रेसर असावा यासाठी दरडोई उत्पन्न वाढवे यासाठी उदयोग वाढावेत यासाठी काम सातत्याने सुरू आहे.

गोमूत्र ज्याला प्यांचे त्याला पिवू द्या

जनआशीर्वाद यात्रा सुरू केल्यानंतर राणे यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले.

त्यानंतर शिवसैनिकांनी तेथे गोमूत्र शिंपडून समाधिस्थळाचे शुद्धीकरण केले.

याचा समाचार घेताना राणे म्हणाले, मुंबईत ३२ वर्षे एकाच पक्षाची सत्ता आहे. मुंबई बकाल होत आहे.

मात्र, काल दादरमध्ये केवळ गोमूत्र आणि गोमूत्र हाच विषय. ज्याला गोमूत्र प्यायचे त्याला पिवू द्या.

मला जेथे नतमस्तक व्हायचे तेथे मी होईन.

गोमूत्र शिंपडण्याऐवजी स्वत:चे मन आधी शुद्ध करा. बाळासाहेबांचे स्मारक दलदलीत आहे.

तेथील फोटोही सरळ दिसत नाही. गोमूत्र शिंपडण्याऐवजी जागतिक दर्जाचे स्मारक करा.

‘सात हजार गुन्हे दाखल करा’

जनआशीर्वाद यात्रा काढून कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राणे यांच्या कार्यकर्त्यांवर सात गुन्हे दाखल केले आहेत. यावर बोलताना राणे म्हणाले, कोविडच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात गुन्हे दाखल केलेत. सरकारने केवळ सात नव्हे ७०, सात हजार गुन्हे दाखल करा. मी त्यांच्या मागे उभा आहे. ज्यांनी गुन्हे दाखल केलेत त्यांना सांगा, तुमच्या डोक्यावर आम्ही बसलो आहोत. त्यामुळे कुणी घाबरू नये.

मुंबईत सत्तापरिवर्तन होणार

गेल्या ३२ वर्षांत मुंबईत बकालपणा वाढला आहे. हा बकालपणा मिठी नदीत वाहून जायचा असेल तर भाजपची महापालिकेत सत्ता यायला हवी. कालची गर्दी पाहून मला सत्ता परिवर्तन होईल असे वाटते. कोरोना हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने उपाययोजना केल्या नाहीत. वैद्यकीय उपाययोजना केल्या नाहीत. टेंडरमध्ये १२ टक्के दिले नाहीत म्हणून टेंडर नाकारले. औषधात पैसे खाणाऱ्या सरकारला गोमूत्र हातात धरण्याची लायकी नाही.

कामे मोजा, गुन्हे कसले मोजता?

राज्यात जे गुन्हे होताहेत, यात शिवसैनिक आहेत. संजय राठोड कोण संत आहे का? एक झाले दोन झाले? त्याचे किती गुन्हे मोजता? कार्य मोजा, गुन्हे काय मोजता, असा सवाल राणे यांनी केला.

Back to top button