वेळ आणि सुट्टया पैशांवरुन 'बेस्ट'चा नवा उपक्रम ; चलो अ‍ॅप, स्मार्ट कार्ड सुविधा | पुढारी

वेळ आणि सुट्टया पैशांवरुन 'बेस्ट'चा नवा उपक्रम ; चलो अ‍ॅप, स्मार्ट कार्ड सुविधा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  वेळ आणि सुट्टया पैशांवरुन होणारे वाद टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने चलो अ‍ॅप, स्मार्ट कार्डची सुविधा सुरू केली आहे. या डिजिटल सेवांना प्रवाशांना चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या तीन महिन्यात या योजनेमुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचला आहे. आतापर्यंत 17 लाख प्रवाशांनी मोबाईल चलो अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.

तर 2 लाख 18 हजार प्रवाशांनी स्मार्ट कार्ड घेतले आहे. मुंबईकरांची सेकण्ड लाईफलाईन म्हणून बेस्टला ओळखले जाते. सध्या बेस्टच्या बसने 30 ते 31 लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी बेस्ट प्रशासनाने ईलेक्ट्रिक बसवर भर दिला आहे.
वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरुन नेहमीच होणारे वाद टाळण्यासाठी डिजिटलायझेशनला प्राधान्य दिले आहे. बेस्टच्या काही बसमध्ये स्वयंचलित यंत्रणा देखील सुरु करण्यात आली आहे.

टॅप इन-टॅप आऊट सुविधा वाढवणार

सीएसएमटी ते नरिमन पॉईंट/कफ परेड दरम्यान बेस्टने टॅप इन-टॅप आऊट सुविधा सुरु केली आहे. याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही महिन्यात आणखी काही मार्गांवर 20 डिजिटल बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल अ‍ॅप किंवा चलो स्मार्टकार्ड वापरून लोक या बसमधून प्रवास करत आहेत. टॅप इन म्हणजे प्रवासी बसमध्ये चढताना टॅप इन करणार आणि उतरताना टॅप आऊट करतात.

सुविधेचे फायदे

या सुविधेमुळे प्रवाशांना घरबसल्या ऑनलाईन रिचार्ज करता येते. वाहक-प्रवाशांमध्ये वाद देखील होत नाही.

पास-तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत नाहीत. बसची सर्व माहिती एका क्लिकवर मिळते.

गेल्या तीन महिन्यात 60 टक्के प्रवाशांनी ऑनलाईन रिचार्ज केले आहे. तर 12 टक्के प्रवासी डिजिटल तिकीट खरेदी करतात.

Back to top button