मुंबई : उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांचा सबुरीचा सल्ला | पुढारी

मुंबई : उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांचा सबुरीचा सल्ला

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारलाही सुरुंग लागण्याची शक्यता आहे. सरकारचा डोलारा कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने तो सावरण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल गुरुवारी दुपारी ऑनलाईन संवाद साधत अधिकार्‍यांचे आभार मानणार होते. मात्र त्यामुळे उद्धव ठाकरे हे सत्ता सोडणार असल्याचा संदेश जाणार असल्याने त्याआधीच पवार यांनी रोखले. तुम्ही सबुरीने घ्या, असा सल्ला पवार यांनी त्यांना दिल्याचे समजते.

पक्षात झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडत राजीनामा देण्याची तयारीही दाखविली होती. त्यामुळे मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली. शरद पवार यांनी संयम बाळगा आणि या पेच प्रसंगातून मार्ग काढण्याचे प्रयत्न करा, असा सल्ला यांनी दिल्यानंतर या धक्क्यातून सावरण्याचे प्रयत्न शिवसेनेत सुरू झाले. मात्र, बंडखोर आमदारांची संख्या वाढत चालली असल्याने शिवसेनेतील संकट अधिकच वाढले आहे.

अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी दुपारी महत्त्वाच्या अधिकार्‍यांशी ऑनलाईन संवाद साधत त्यांना केलेल्या सहकार्याबाबत आभार मानणार होते. मात्र त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एक्झिट मोडमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली असती. त्यामुळे शरद पवार यांनी हा संवाद टाळण्यास उद्धव ठाकरे यांना सांगितले आणि उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय मागे घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली. आमदारांच्या मुंबईत येण्याची प्रतीक्षाबंडखोर आमदार हे प्रतिसाद देत नसल्याने महाविकास आघाडीवरील संकट गडद होत चालले आहे.

शिवसेना आमदार एकदा मुंबईत आले की, त्यातील काहीतरी आमदार शिंदे यांची साथ सोडतील, अशी शिवसेनाच नाही तर शरद पवार यांनाही खात्री आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी ‘आधी मुंबईत या, मग महाविकास आघाडीतून बाहेर पडू’ असा निरोप दिला आहे. शिंदेंच्या गोटातील 20 ते 21 आमदार संपर्कात असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आमदार राज्यात परतल्यानंतर या सत्तानाट्याला वेगळी कलाटणी देता येईल, असे शरद पवार आणि मविआच्या नेत्यांना वाटत आहे.

Back to top button