नारायण राणे म्हणाले, 'ते महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेत' - पुढारी

नारायण राणे म्हणाले, 'ते महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेत'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईतून जनआशीर्वाद यात्रा सुरु केली. यावेळी संबंधित करताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेत त्यांना सांगूया की तुमचा काळ संपलाय. राज्यात भाजप सत्तेवर येईल आणि सुखा समाधानाचे चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त करुया, असे राणे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी मला दिल्लीला पाठवलं. मी केंद्रीय मंत्रिमंडळात सुक्ष्म, लघू- उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना महाराष्ट्राचे नाव दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

राणे यांचे आज गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. तेथून त्यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनआशीर्वाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.

यादरम्यान बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्रातील जनता आताच्या सत्तेला कंटाळली असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी उपस्थित होते.

आज १९ ऑगस्टपासून सुरू झालेली ही जनआशीर्वाद यात्रा मुंबईतील विविध विभागांत २१ ऑगस्टपर्यंत काढली जाणार आहे. त्यानंतर पुढे कोकणात ही यात्रा जाणार आहे.

मात्र, नारायण राणे जनआशीर्वाद यात्रा सुरू करण्यामागे आगामी मुंबई महापालिका निवडणुका असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. नारायण राणे यांना शिवतीर्थावर जाण्यासाठी शिवसेनेने ग्रीन सिग्नल दिला असल्याचे समजते. राणे हे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी आल्यानंतर कुठलाही विरोध न करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले, टायर पकडून चालले होते लटकत |

Back to top button