साई रिसॉर्टप्रकरणात परब तिसर्‍या दिवशीही ईडीसोबत | पुढारी

साई रिसॉर्टप्रकरणात परब तिसर्‍या दिवशीही ईडीसोबत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील सत्ताकारणावरुन मोठ्या घडामोडी सुरु असतानाच शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे सलग तिसर्‍या दिवशी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांनी कसून चौकशी केली. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणात ईडीकडून परब यांची चौकशी करण्यात येत असून गुरुवारी दुपारी ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले होते.

शिवसेनेतील एक महत्त्वाचे नेते असलेले अनिल परब हे वेगवेगळ्या प्रकारच्या आरोपांवरुन तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यातील साई रिसॉर्टप्रकरणी मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल करुन ईडी तपास करत आहे. ईडीने याच संबंधात 26 मे रोजी मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील सात ठिकाणी छापेमारी केली होती. या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेली कागदपत्रे आणि दस्तऐवज तसेच दापोलीतील साई रिसॉर्ट संबंधीच्या कागदपत्रांच्या आधारे ईडीचे अधिकारी परब यांच्याकडे चौकशी करत आहेत.

ईडीच्या समन्सनुसार परब हे गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ईडीच्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात पोहचले. परब यांच्या चौकशीचा हा तिसरा दिवस आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी दुपारपासून त्यांच्याकडे चौकशी केली आहे. ही चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरु रहाणार असल्याचे समजते. दरम्यान, तपास यंत्रणांना कायम सहकार्य करणार असल्याचे परबांनी म्हटले आहे.

Back to top button