मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला, मुक्‍काम आता ‘मातोश्री’वर | पुढारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला, मुक्‍काम आता ‘मातोश्री’वर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्रिपद किंवा पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास मी नालायक आहे, असे कोणाला वाटत असेल; तर मला समोर येऊन सांगा. मी दोन्ही पदे सोडायला तयार आहे. मी राजीनामा तयार ठेवतोय, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी बुधवारी ऑनलाईन संवाद साधला आणि रात्री ‘वर्षा’ बंगला सोडून ते ‘मातोश्री’ मुक्‍कामी पोहोचले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रथमच राज्यभरातील शिवसैनिकांशी आणि जनतेशीही संवाद साधला. भाजपसोबत सरकार स्थापन करा, ही शिंदे यांची मुख्य मागणी आहे. मात्र, या मागणीवर कोणतेही उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले नाही. उलट समोर येऊन राजीनामा मागा; मुख्यमंत्रिपदच काय, शिवसेना पक्षप्रमुख पददेखील सोडण्यास आपण तयार आहोत, असे जाहीर करत उद्धव यांनी या संघर्षाचा चेंडू शिंदेंकडे टोलवला.

मुख्यमंत्रिपद किंवा पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास मी नालायक आहे, असे कोणाला वाटत असेल, तर त्याने इकडून तिकडून नव्हे; तर मला समोर येऊन सांगावे. मी दोन्ही पदे सोडायला तयार आहे. मला पदांचा मोह नाही. मी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असेल, तर ते मला आनंदाने मान्य असेल; पण त्याहीपलीकडे जाऊन केवळ मी मुख्यमंत्री नको, दुसरा कुणीही असला तरी चालेल, तर तेही मला मान्य आहे. फक्‍त एकदा मला समोर येऊन सांगा किंवा तिकडून फोन करून सांगा, तुमचे आम्ही फेसबुक लाईव्ह पाहिले. आम्हाला तुमच्यासमोर येण्यास संकोच वाटतो; पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आम्हाला तुम्ही नकोत. मी या क्षणाला मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. कोणत्याही पदाचा मोह मला अडवू शकणार नाही, माझा राजीनामा तयार ठेवला असून, आजपासूनच मी ‘वर्षा’ बंगला सोडून माझा मुक्‍काम ‘मातोश्री’वर हलवत आहे. जोपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी जोडून दिलेला शिवसैनिक माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मी कोणत्याही आव्हानाला सामोरे जायला तयार आहे, असे उद्धव म्हणाले.
शिवसेनेकडे किती आणि शिंदेंकडे किती आमदार, यावर बोलणेही उद्धव यांनी टाळले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी, तर काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी बुधवारी सकाळी फोन करून आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्‍वास दिला; पण माझ्याच लोकांना मी नको असेन, तर मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. त्यांनी समोर येऊन सांगावे, सुरतला जाऊन बोलण्याची गरज नाही. त्यांनी स्टेटमेंट दिले, तर मी तत्काळ राजीनामा देईन.

सरकारमधून बाहेर पडण्यावर शिंदे ठाम! ठाकरेंचे आवाहन धुडकावले

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला समोर बसून चर्चा करण्याचा प्रस्ताव धुडकावला असून, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडावे या भूमिकेवर ते ठाम आहेत.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधल्यानंतर सायंकाळी शिंदे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र तो बेत नंतर रद्द झाला. त्यानंतर रात्री सव्वा आठच्या सुमारास शिंदे यांनी दोन ट्विट करून मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुखांना उत्तर दिले.

गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्‍त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला.
घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे-शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, असे शिंदे पहिल्या ट्विटमध्ये म्हणतात.

पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी या अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असून, महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे, असे शिंदे यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शिंदे सरकारमधून बाहेर पडण्यावर ठाम असल्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात यावर या बंडखोरीचे फलित अवलंबून असेल. मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर तसे मला फोन करून सांगा, असे उद्धव यांनी बंडखोरांना उद्देशून म्हटले होते. परंतु या दोन्ही ट्विटमध्ये शिंदे यांनी तशी कोणतीही मागणी केलेली नाही. मात्र, दोन्ही काँग्रेससोबतच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या, असे शिंदे यांनी पुन्हा सांगून एक प्रकारे उद्धव यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याचाच सल्‍ला दिला आहे.

Back to top button