…तर खोटे गुन्हेही दाखल करून घेऊ! | पुढारी

...तर खोटे गुन्हेही दाखल करून घेऊ!

 मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) आणि विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यांत कोणी अडकू नये म्हणून तक्रारींची शहानिशा करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्याला जोरदार विरोध होत आहे. जर विरोधकांची इच्छा असेल तर, आम्ही पोक्सो आणि विनयभंगाचे खोटे गुन्हेही दाखल करून घेऊ, असे विधान मुंबईचे पोलीस आयुक्‍त संजय पांडे यांनी केले आहे.

बाल लैंगिक अत्याचार अथवा  विनयभंगाच्या येणार्‍या वरुन तक्रारींवरून परिपत्रकाच्या माध्यमातून दिलेले आदेश मागे घेण्यासाठी जोरदार विरोध होत असतानाच दुसरे परिपत्रक काढून या आदेशात फेरबदल केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यावर पुन्हा एकदा भाष्य केले.

पोक्सो आणि विनयभंग यासंबंधीच्या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतला जात असल्याच्या आपल्या निरीक्षणाचा पुनरुच्चार करताना त्यांनी ज्या प्रकरणात तथ्य नाही. ज्यामध्ये वैयक्तिक वादातून गुन्हे दाखल होत असतील तर ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे. गुन्ह्यात अटक करण्याची गरज नाही, पण गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे असेल तर आम्ही काय करणार, असा सवाल करत त्यांनी आजही विविध खोट्या गुन्ह्यात 10 ते 15 टक्के लोक कैद असतील.  काहींना तर शिक्षाही सुनावण्यात येत असल्याचे म्हटले आहे. गुन्हा दाखल करताना कुठलाही विचार करण्याची गरज नसेल. तर, त्यानंतरही विचार का करायचा. 50 टक्के गुन्हे खोटे निघाले तरी काय फरक पडतो.

गुन्ह्यांच्या तपासासाठी वरिष्ठांची आवश्यकता काय आहे. एक हवालदार देखील तपास करू शकतो. त्यालाच तपास द्या. याचा सरकारलाही फायदा होईल. आम्ही सुट्ट्याचा आनंद घेऊ आणि फक्त सही करण्याचे काम करू, असेही खळबळजनक वक्तव्य पांडे यांनी केले आहे. तसेच, न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून म्हणणे मांडणार असून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू, असे त्यांनी नमूद केले आहे.

Back to top button