लोकसभेसाठी महाराष्ट्रात भाजपचे ‘मिशन 45’ | पुढारी

लोकसभेसाठी महाराष्ट्रात भाजपचे ‘मिशन 45’

मुंबई : पुढारी वृत्तसेवा  सन २०२४ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन ४५’ चा निर्धार केला आहे. राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प पक्षाने सोडला आहे. याशिवाय कोल्हापूर, सातार्‍यासह १६ मतदारसंघांत विशेष लक्ष दिले जाणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विजयामुळे बळ मिळालेल्या भाजपने गुरुवारी झालेल्या
बैठकीत या निवडणुकीसाठीची रणनीती निश्‍चित केली. फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत जिंकलेल्या जागांवर पक्षाचे लक्ष आहेच. पण पराभव झालेल्या कोल्हापूर, सातार्‍यासह राज्यातील प्रमुख मतदारसंघांवर विशेष लक्ष दिले जाईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत वेगळे राजकीय चित्र होते. आता ते बदलले आहे. भाजपला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळेच आम्ही ‘मिशन ४५’चे टार्गेट ठेवले आहे.

लोकसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा अवधी असला तरी पक्षाकडून विविध मतदारसंघांची चाचपणी तसेच तेथील राजकीय स्थितीचा आढावा घेतला जात आहे. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांकडून मिळालेली माहिती हे ‘मिशन ४५’ चा एक भाग असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. प्रत्येक मतदारसंघात मंत्र्यांना कामे वाटून दिली आहेत. संपूर्ण देशभरात या पद्धतीने निवडणुकीची तयारी केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अजित पवार यांच्याविरोधात स्वकीयांचे षड्यंत्र

देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिले नाही, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करीत असल्याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि अजित पवार या कार्यक्रमात खूप मनमोकळेपणे बोलले. मोदी यांनी अजित पवार यांची विचारपूसही केली. एवढेच नाही तर भाषण करणार्‍यांच्या यादीत अजित पवार यांचे नाव नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः अजित पवारांना भाषण करण्यास सांगितले. त्यावर अजित पवार यांनी आपण बोलणार नसल्याचे सांगितले. मोदी आणि अजित पवार यांच्यातील जिव्हाळा काही लोकांना पाहवला नाही. मला तर वाटते, हे अजित पवार यांच्या विरोधातील षड्यंत्र आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या ईडी कारवाईबाबत काँग्रेसने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. त्यावरही फडणवीस यांनी टीका केली. राहुल गांधी यांची चौकशी नियमानुसारच होत आहे. भ्रष्टाचार करण्याचा कोणालाही परवाना दिलेला नाही, असे ते म्हणाले. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणले आहे. यावरून एमआयएम ही शिवसेनेची ‘बी’ टीम असल्याचे सिद्ध होते, असे फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पक्ष कुठल्याही उमेदवाराला टार्गेट करून निवडणूक लढवत नाही. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी निवडणूक लढत असतो, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रपतीपदाची निवडणूक न लढवण्याचा शरद पवार यांचा निर्णय व्यक्‍तिगत असल्याचे त्यांनी सांगितले.

संरक्षण खात्याच्या अग्‍निपथ योजनेच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन चुकीचे आहे. सरकारने नियमित सैन्य भरती बंद केलेली नाही. ती सुरूच राहणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही फडणवीस आपली चक्रे फिरवून विजयश्री मिळवतील, असा दावा केला.

समितीची स्थापना

राज्यातील लोकसभेच्या सर्व मतदारसंघातील रणनिती ठरविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे समितीच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघासाठी एका नेत्याची नियुक्‍ती केली जाणार आहे.

पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांच्यात मनमोकळी चर्चा झालेली त्यांच्याच पक्षातील काहींना पाहवले नाही. त्यामुळे अशा लोकांनीच अजित पवार यांच्याविरोधात षड्यंत्र रचले असावे, अशी मला शंका आहे.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राज्यसभा  निवडणुकीतील भाजपच्या विजयाची पुनरावृत्ती विधान परिषद निवडणुकीतही होणार आहे. राज्यसभेतील जल्लोषानंतर शिल्लक राहिलेला गुलाल आम्ही विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर उधळणार आहोत.                                                                      -चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

हेही वाचा

 

Back to top button