भरतीच्यावेळी समुद्राने फेकला 4 टन कचरा ! | पुढारी

भरतीच्यावेळी समुद्राने फेकला 4 टन कचरा !

मुंबई : पुढारी वृत्तसेवा अरबी समुद्राला गेल्या दोन दिवसापासून मोठी भरती असल्यामुळे समुद्रात ४.३० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. त्यामुळे समुद्रातील कचरा गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव व अन्य चौपाटीवर फेकला गेला. आतापर्यंत ४ टन पेक्षा जास्त कचरा उचलण्यात आला असून अजूनही कचरा उचलण्याचे काम सुरू आहे.

अरबी समुद्राला १५ जूनपासून १५ जूनपर्यंत मोठे उधाण आहे. यावेळी समुद्र खवळलेला राहणार असून यावेळी समुद्रात तब्बल ४.६६ ते ४.८७  मीटरच्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे नाल्यावाटे व अन्य मार्गाने समुद्रात गेलेला कचरा लाटांबरोबर बाहेर फेकला जात आहे. त्यामुळे बुधवारी रात्रीपासून गेटवे ऑफ इंडियासह मरीन ड्राईव्ह, गिरगाव, दादर, माहीम, खार, जुहू, सात बंगला, वेसावे, मढ आधी चौपाट्यांवर कचर्‍याचा गालीचा तयार होत आहे.

गुरुवार १६ जूनला दुपारी १.३५ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती होती. यावेळी समुद्रात ४.८७ पेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. त्यामुळे शेकडो टन कचरा समुद्र किनार्‍यावर फेकला गेला. शुक्रवार १७ जून व शनिवार १८ जून रोजी अरबी समुद्राला मोठी भरती असून यावेळी ४.६६ ते ४.८० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा समुद्र किनार्‍यावर फेकला जाण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवण्यात आली.

आपत्ती टळली

अरबी समुद्राला बुधवार १४ जून ते १८ जूनपर्यंत मोठी भरती असल्यामुळे या काळात शहरात मुसळधार पाऊस पडला असता तर, मुंबईची तुंबई झाली असती. पण शहर व उपनगरात गेल्या दोन दिवसात पाऊसच न झाल्यामुळे मोठी आपत्ती तळली. मात्र, शुक्रवार व शनिवारी अरबी समुद्राला मोठी भरती असल्यामुळे या काळात पाऊस पडला तर, शहरात पाणी तुंबण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवण्यात येत आहे.समुद्र किनार्‍यालगतचा कचरा साफ करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाचे सफाई कामगार बुधवारपासूनच कामाला लागले आहेत. दररोज समुद्र किनार्‍यावर कचरा फेकला जात असल्यामुळे सफाई कामगारांची टीम समुद्रकिनार्‍यालगत तैनात करण्यात आली आहे.

Back to top button