‘आषाढी’साठी एसटीच्या ४७०० विशेष गाड्या, ‘या’ बसस्थानकातून व्यवस्था | पुढारी

‘आषाढी’साठी एसटीच्या ४७०० विशेष गाड्या, 'या' बसस्थानकातून व्यवस्था

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; कोरोनाच्या संकटानंतर यंदा पंढरपूर येथे होणार्‍या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे 4 हजार 700 विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल परब यांनी बुधवारी केली. 6 ते 14 जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहोळ्यासाठी 8 जुलैला 200 बस उपलब्ध केल्या आहेत. यात्रेसाठी औरंगाबाद प्रदेशातून 1200, मुंबई 500, नागपूर 100, पुणे 1200, नाशिक 1000 तर अमरावती येथून 700 विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणार्‍या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एसटीने विशेष बस उपलब्ध करून दिल्या होत्या. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर दोन वर्षांनतर यंदा वारी सोहळा होणार आहे.

दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

स्थानकाचे नाव जिल्हानिहाय सोडण्यात येणार्‍या बसेस

चंद्रभागा बसस्थानक – मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर

भिमा यात्रा देगाव – औरंगाबाद, नागपूर व अमरावती प्रदेश

विठ्ठल कारखाना – नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

पांडुरंग बसस्थानक – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार
वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पूर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

Back to top button