OBC : "शरद पवारांचे ओबीसींप्रतिचे प्रेम आज उफाळून आलंय" | पुढारी

OBC : "शरद पवारांचे ओबीसींप्रतिचे प्रेम आज उफाळून आलंय"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : “शरदचंद्र पवार यांचं अचानकपणे ओबीसींप्रतिचे (OBC) प्रेम आज उफाळून आलं आहे. असं म्हणतात की ते कुठलंही काम हेतुशिवाय करत नाहीत आणि खरा हेतू कधी दाखवतही नाहीत. पण मला त्यांना एकच सांगायचं आहे. केंद्रानं ताट वाढलंय खरे आहे. तुमचे हात पण बांधले गेले आहेत तेही खरे आहे”, अशी टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

पडळकर पुढे म्हणतात की, “हे हात कुणामुळे बांधले गेले? केंद्रामुळे की आपल्या पै-पाहुण्यांच्या प्रेमामुळे? उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी नातू यांनाचं मोठं केले. आणि जेव्हा जेव्हा सत्तेचा भाग बनलात तेव्हा तेव्हा आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले.”

“जो २०११ सालचा सेन्सेस अहवाल तुम्ही आता मागता आहात, त्यातील घोळ तुम्ही सहभागी असलेल्या मनमोहनसिंग सरकारनेच घातला आहे. भागिदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंबा मात्र मोदी सरकारच्या नावानं ठोकायच्या…”, अशीही टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

“मला जातीयवादी विष पसरवणाऱ्यांना हेच विचारचं आहे की, तुम्हाला जातनिहाय जनगणनेचा डेटा कशाला हवा आहे? ओबीसींच्या (OBC) राजकीय आरक्षणाकरिता तुम्हाला इंपेरिकल डेटा द्यायचा आणि मराठा आरक्षणाबाबात आपण अजून त्यांना मागासलेले सिद्ध करण्याची कोणतीही  प्रक्रियाच सुरू केलेली नाहीये.”

“नुसत्या भुलथापा मारायच्या आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं,  ही तुमची प्रस्थापितांची करामत आज आम्हा बहुजनांना कळाल्यामुळेच जे मराठा आरक्षणाबाबत बोलताना नेहमी पळ काढत होते. अशा शरदचंद्र पवारांनांचं आज भूमिका मांडायला लागते आहे, हाच आमच्या बहुजनांचा प्रस्थापितांविरोधतला पहिला विजय आहे”, असंही मत गोपीचंद पडळकर यांनी मांडलं आहे.

येत्या काळात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध – शीतलकुमार रवंदळे

Back to top button