आता गाफिल राहू नका! शरद पवार यांची ज्येष्ठ मंत्र्यांना सूचना | पुढारी

आता गाफिल राहू नका! शरद पवार यांची ज्येष्ठ मंत्र्यांना सूचना

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीतील अनुभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच सतर्क झाले आहेत. शिवसेनेचे राज्यसभा उमेदवार संजय पवार यांच्या पराभवाच्या संशयाची सुई राष्ट्रवादीकडेच झुकत असल्याची चर्चा सुरु झाल्याचे पाहून राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही गाफील राहू नका, अशी सूचना पवार यांनी आपल्या ज्येष्ठ मंत्र्यांना दिली असल्याचे समजते.

विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी ज्येष्ठ मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली होती.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदार संजयमामा शिंदे आणि देवेंद्र भुयार यांची मते फुटल्याचा आरोप केला होता. हे दोघेही राष्ट्रवादीशी जवळीक असणारे आमदार आहेत. तर राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर यातून आपल्याला धक्का बसला नसल्याचे विधान पवार यांनी केले होते. या दोन्ही बाबींची दखल घेत शिवसेनेने आपली नाराजी पवार यांच्यापर्यंत पोहचवली होती. याची दखल घेत पवार यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दगाफटका होऊ नये, याची काळजी घेण्याचे आदेश आपल्या मंत्र्यांना दिल्याचे कळते.

शिवसेनेची राजकीय नाराजी परवडणारी नाही. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कोणी कोणत्या आमदारांशी संपर्क करायचा, अपक्षांच्या मतदारसंघातील कोणती मोठी कामे प्रलंबित आहेत, त्यांच्याकडून आणखी किती निधीची अपेक्षा आहे याची माहिती गोळा करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असेही पवार यांनी सांगितल्याचे समजते. यासोबतच विधानपरिषदेच्या रणनितीबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

Back to top button