मुख्यमंत्री मरु द्या, आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या : दत्‍तामामा भरणे | पुढारी

मुख्यमंत्री मरु द्या, आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या : दत्‍तामामा भरणे

सोलापूर ; पुढारी वृत्‍तसेवा :   सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहीमेचे आयोजन केले होते. त्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव रोड येथे 43 एकर जागेवर गटनेता आनंद चंदनशिवे यांच्या भांडवली निधीतून वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्‍तामामा भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.

मुख्यमंत्री मरु द्या

या कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केलं. यावेळी चंदनशिवे यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हा असे म्हणत त्‍यांचं कौतुक केले. त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी चंदनशिवे यांना दादा मला खूप काही मिळाले आहे. तुम्हाला काय द्यायचं आशीर्वाद तो माझ्या अजितदादांना द्या असे म्हणत महापौरांशी बोलताना थेट मुख्यमंत्री मरु द्या असे वादग्रस्त वक्तव्य केले.

दरम्यान, पालकमंत्री भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांविषयी विधान अवधानाने झाले. त्याचा विपर्यास करु नये असे सांगत मंत्री भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करत असल्याचा व्हिडियो व्हायरल केला आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमातच पालकमंत्री भरणे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने उपस्थित पत्रकारांसह सर्व प्रशासनातील अधिकारी आवाक झाले.

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. नागरिकांनी कोरोनाची काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस पथकाने मानवंदना दिली.

यावेळी भरणे यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. भरणे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचा दर कमी करण्यात यश आले असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही याचप्रमाणे यश येईल. कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून भरीव निधीची तरतूद केली असून राज्य स्तरावरुनही भरघोस निधी दिला जाईल.

आरोग्याच्या बळकटीकरणावर भर

जिल्ह्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत होण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे बळकटीकरण करण्यावर भर दिला आहे. खास महिला आणि मुलांसाठीच्या स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी लवकरच पूर्ण होईल. साथरोग नियंत्रण रुग्णालय सुरु केले जाणार असून उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मनुष्यबळ आणि औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.

किसान रेल्वेची शेतकऱ्यांना मदत

यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पेरणीखालील क्षेत्र वाढले आहे. ही बाब अतिशय समाधानाची आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री विमा योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात फळ, पिके चांगल्या प्रकारे होत आहेत. या पिकांचे व्यापारी तत्वावर उत्पादन व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर सल्ला केंद्र देखील स्थापन करण्यात येत आहेत. किसान रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बळीराजाचा शेतमाल मोठ्या शहरात पोहोचू लागला आहे, यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत आहे, ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ई-पीक पाहणी प्रकल्पातून अचूक मदत

महसूल विभागाने आजपासून ई-पीक पाहणी प्रकल्प सुरू केला असून आता शेतकऱ्यांना आपल्या शेतात कोणत्या गटात कोणते पीक लावले याची माहिती मोबाईल ॲपद्वारे भरता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास अचूक मदत मिळणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन भरणे यांनी केले.

शेतकऱ्यांना जमिनींचे उतारे झटपट मिळण्यासाठी राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत सातबारा उताऱ्यांसोबत 8/अ उताराऱ्यांचेही संगणकीकरणाचे काम सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 16 लाख वृक्षारोपण

जिल्ह्यात वनाचे क्षेत्र वाढण्यासाठी माझे रोप, माझी जबाबदारी अभियानातून जास्तीत जास्त देशी, स्थानिक प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यावर भर देण्यात येत आहे. वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत जिल्ह्यात यंदा सुमारे 16 लाख वृक्षारोपण केले जात आहे. वृक्ष लागवडीच्या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सोलापूर शहराला मुबलक आणि रोज पाणीपुरवठा होण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचे काम वेगाने सुरू आहे. राज्य शासनाने या प्रकल्पांस प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेची तयारी

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका व्यापक प्रमाणावर प्रयत्न करीत आहेत. सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग आणि मृत्यूचा दर कमी करण्यात यश आले आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही याचप्रमाणे लवकरच यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून बेडची उपलब्धता, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

टेस्ट, ट्रेस, ट्रीट आणि व्हॅक्सिनेट फॉर्म्युला

जिल्हा प्रशासनाने माझे गाव, कोरोनामुक्त गाव, माझे मूल, माझी जबाबदारी या योजना ग्रामीण भागात राबविल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली.

कोरोना अजून संपलेला नसल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. गर्दी टाळावी, मास्कचा वापर आणि स्वच्छता याला महत्व देण्याचे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.

जिल्ह्यात टेस्ट, ट्रेस, ट्रीट आणि व्हॅक्सिनेट या फॉर्म्युल्याचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा पहिला डोस 22.2 टक्के नागरिकांना तर दुसरा डोस 73.3 टक्के नागरिकांना देण्यात आला आहे.

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, सार्वजनिक आरोग्य, महानगरपालिका यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पहा व्हिडिओ : कोल्हापूरकरांनी जपलीय स्वातंत्र्यवीरांची रक्षा

Back to top button