कोल्हापूरच्या २ मल्लांमध्ये ‘कुस्ती’ अटळ; राज्यसभा बिनविरोधचा ‘मविआ’चा प्रस्ताव भाजपने फेटाळला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये ऐनवेळी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने आता या निवडणुकीत प्रतिष्ठेची लढत होणार आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असून खरी कुस्ती शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे उमेदवार माजी खासदार धनंजय महाडिक या दोन कोल्हापूरकरांमध्ये रंगणार आहे.

महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपला 20 तारखेला होणार्‍या विधान परिषद निवडणुकीत एक जादा जागा सोडण्याचा दिलेला फायद्याचा प्रस्तावही भाजपने नाकारल्याने महाविकास आघाडीनेही आता सावध पवित्रा घेतला आहे. दगाफटका होण्याची शक्यता पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या तंबूची चाचपणी करण्यासाठी 6 जूनला अपक्ष व पाठिंबा देणार्‍या घटक पक्षांच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

विधानसभा आमदारांमधून निवडून जाणार्‍या राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप तीन, शिवसेनेने दोन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे सहा जागांसाठी सात उमेदवारी अर्ज आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवारी तीन वाजेपर्यंत अंतिम वेळ होती. त्यापूर्वी सकाळी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले. पण ते निष्फळ ठरल्याने सातही अर्ज कायम राहिले. त्यामुळे आता 10 तारखेला निवडणूक होणार असून घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे. भाजपने आपला तिसरा अर्ज पान 6 वर
मागे घ्यावा म्हणून महाविकास आघाडीकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार आणि शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तासभर निवडणूक बिनविरोध करण्यावर वाटाघाटी करण्यात आल्या. पण या वाटाघाटी निष्फळ ठरल्या. दोन्हीकडून परस्परांना उमेदवारी मागे घेण्याचा प्रस्ताव दिल्याने चर्चा फिसकटली.

भाजपने नाकारला विधान परिषदेच्या जादा जागेचा प्रस्ताव संख्याबळानुसार भाजपच्या दोन जागा निवडून येणार आहेत. तर महाविकास आघाडीच्या चार जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळे भाजपने दिलेला एक उमेदवार मागे घ्यावा. त्या बदल्यात 20 तारखेला 10 जागांसाठी होणार्‍या विधान परिषद निवडणुकीत चार जागा जिंकण्याची संधी असताना पाचवी जागा देऊ आणि ही निवडणूकही बिनविरोध करू, असा प्रस्ताव छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीस यांना दिला. मात्र फडणवीस यांनी राज्यसभेच्या दुसर्‍या जागेसाठी शिवसेनेकडेही संख्याबळ नाही. त्यामुळे शिवसेनेने आपला उमेदवार मागे घ्यावा. आम्ही विधान परिषदेची पाचवी जागा लढणार नाही, असा प्रस्ताव दिला. त्यावर एकमत न झाल्याने ही बैठक फिसकटली. दुपारी 12 वाजता ही बैठक संपल्यानंतर तीन वाजेपर्यंत काही तरी तोडगा निघेल, अशी आशा होती. मात्र ती देखील फोल ठरली. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि भाजपने निवडणूक रिंगणात शड्डू ठोकले आहेत. या निवडणुकीत दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली असून अपक्ष आणि छोट्या पक्षांची मते खेचण्यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. भाजपने विधान परिषदेच्या जादा जागेचा प्रस्ताव नाकारल्याने या निवडणुकीत भाजप तयारीने मैदानात उतरले असल्याचे संकेत महाविकास आघाडीला गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने लगेच मोर्चेबांधणी सुरू केली.

आम्हाला निवडणूक टाळायची होती; भाजप घोडेबाजार करणार
राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार हेच निवडून येतील. अपक्ष आमदार आघाडीच्याच पाठीशी आहेत. निवडणूक टाळण्यासाठी आघाडीचे दोन नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले. मात्र त्यांच्याकडून अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता भाजपकडून घोडेबाजार होणार, असे दिसत आहे.
– संजय राऊत, शिवसेना नेते

राज्यसभेच्या बदल्यात विधान परिषद देण्याचा प्रस्ताव आमचा
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यसभेची तिसरी जागा मागे घेण्याच्या बदल्यात विधान परिषदेची एक जागा जास्त देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याबदल्यात आम्हीच त्यांना प्रस्ताव दिला की, तुम्ही राज्यसभेसाठीची दुसरी जागा मागे घ्या. आम्ही विधान परिषदेची पाचवी जागा लढवणार नाही.
– चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

Exit mobile version