मुंबई : जुलैपर्यंत पाणीटंचाई नाही | पुढारी

मुंबई : जुलैपर्यंत पाणीटंचाई नाही

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये 21.99 टक्के म्हणजे 3 लाख 18 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणार्‍या भातसा तलावातही 22.58 टक्के इतका पाणीसाठा असल्यामुळे जुलै मध्यापर्यंत मुंबईकरांना पाणी टंचाईची भीती नाही.

राज्यातील शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके नागरिकांना सोसावे लागत असले तरी, मुंबईकर पाण्याच्या बाबतीत सुखी आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणार्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सातही तलावांमध्ये जुलै मध्यापर्यंत पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला दररोज 1850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणार्या भातसा तलावात 1 लाख 61 हजार 900 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मध्य वैतरणा तलावातही सुमारे 82 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मोडक सागर 43 हजार तर तानसा 22 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक असल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबई शहराला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे महिना सरासरी 1 लाख 15 हजार ते 1 लाख 19 हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. तलावातील पाण्याचा साठा लक्षात घेता, हे पाणी जुलै मध्यापर्यंत पुरेल इतके आहे. त्यामुळे शहरात सध्या तरी पाणीकपात करावी लागणार नसल्याचे जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने स्पष्ट केले.

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये) बुधवार 18 मे सकाळी 6 वाजेपर्यंत
मोडकसागर – 43,813
तानसा – 22,188
मध्य वैतरणा – 82,104
भातसा – 1,61,900
विहार – 5,466
तुळशी – 2,797

Back to top button