डोंबिवली : ‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’ | पुढारी

डोंबिवली : ‘पाण्यामुळे जिवाची माणसं गमावली, पैसे नको पाणी द्या’

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी कपडे धुण्यासाठी खदानीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना जीव गमवावा लागला. या कुटुंबाला भेटण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले बुधवारी (दि.१८) सायंकाळी त्यांच्या घरी गेले. त्यानंतर कुटुंबाला 50 हजार रुपये देण्याची त्यांनी घोषणा केली. मात्र आम्हाला पैसे नको पाणी द्या. आम्हाला भेटायला आणि सांत्वन करायला येऊ नका. आमची माणसं पाण्यामुळे आमच्यापासून दुरावली. तुम्ही पाणी देणार का ? असा सवाल या कुटुंबाने मंत्र्यांना विचारला.

डोंबिवली नजीक असणाऱ्या देसले पाडा येथे पाण्याची टंचाई आहे. गेल्या आठवड्यात सुरेश गायकवड यांच्या कुटुंबातील तीन नातवंड, पत्नी आणि सून कपडे धुण्यासाठी घरापासून अर्ध्या तास चालत जावून असणाऱ्या खदानीकडे कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी एका छोट्या मुलाचा पाय पाण्यात घसरला आणि त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात एकच कुटुंबातील या पाच जणांना खदानीमध्ये जल समाधी मिळाली. याच घटनेला १२ दिवस उलटून गेल्यावर बुधवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे त्या कुटुंबियांचे सांत्वन करायला गेले होते.

मात्र आमचे सांत्वन करायला येऊ नका. आम्हाला पैशांची भीक नको आम्हाला पाणी हवे, आम्हाला पाणी द्याल का ? असा संतप्त सवाल कुटुंबियातील सदस्यांनी आठवले यांना केला. यावेळी रामदास आठवले यांनी तत्काळ या गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. जिल्हाधिकारी तसेच महापालिका प्रशासनाला पाणी समस्या सोडवण्यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.नको पाणी द्या असा सवाल केला.

हेही वाचा

Back to top button