गणेशोत्सव : मूर्ती छोटी तरी थाटामाटात साजरा होणार उत्सव | पुढारी

गणेशोत्सव : मूर्ती छोटी तरी थाटामाटात साजरा होणार उत्सव

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे मुंबईसह राज्यामध्ये सलग दुसर्‍या वर्षी विविध निर्बंधाचे पालन करत गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. गणेशमूर्तीची उंची वाढवण्यावर सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने अखेर गणेशोत्सव मंडळांनी यंदा मूर्ती लहान ठेवत थाटामाटात उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः राज्यातील पूरग्रस्त भागात मदत करण्यापासून पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात यंदा गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे लालबाग-परळमधील गणेशोत्सव मंडळांचे म्हणणे आहे.

याबाबत मंडळाचे सचिव स्वप्नील परब म्हणाले की, सरकारने गणेशमूर्तीची उंची वाढवण्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. उत्सवास काहीच दिवस शिल्लक असल्याने मंडळाने यंदाही गतवर्षीप्रमाणेच पूजेची चार फुटांची शाडूची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदा 22 फूट उंच उत्सवमूर्ती तयार करणे शक्य नाही. त्यामुळे उत्सवातील काही निधी मंडळाने पूरग्रस्तांसाठी वापरण्याचा निश्चय करत तो पूर्णही केला आहे. दरम्यान, बाप्पासाठी मनमोहक आरास व देखावा यंदा साकारला जाणार आहे. ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था मंडळाने केली असून शासन नियमांचे पालन करताना उत्सवाचे स्वरूप भव्यदिव्य ठेवण्याचा संकल्प असल्याचे परब यांनी सांगितले.

चिंचपोकळीचा चिंतामणीचे मानद सचिव वासुदेव सावंत म्हणाले की, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याची तयारी मंडळाने दाखवली होती. मात्र किमान गणेशमूर्तीची उंची वाढवावी, अशी सर्वात पहिली मागणी चिंतामणीतर्फे करण्यात आली होती. मात्र मूर्तीच्या उंचीबाबत कोणताही दिलासा मिळत नसल्याने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशाची चांदीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. मूर्तीची उंची लहान असली, तरी उत्सवाची उंची अधिक उंच करण्याचे मंडळाने ठरवले आहे.

Back to top button