शिवसेना राज्यसभेची दुसरी जागा लढविणार | पुढारी

शिवसेना राज्यसभेची दुसरी जागा लढविणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना आपला दुसरा उमेदवार उभा करणार असल्याचे शिवसेना नेते परिवहनमंत्री अनिल परब यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे संभाजीराजे यांच्या अडचणी वाढू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेड येथे बोलताना संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच सहावी जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत भाजपचे दोन, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार सहज निवडून जाणार आहे. त्याशिवाय सहाव्या जागेसाठी भाजपकडे 22, तर महाविकास आघाडीकडे सुमारे 33 मते अतिरिक्‍त आहेत. जिंकून येण्यासाठी किमान 42 मतांचा कोटा आवश्यक आहे.

अतिरिक्‍त मते, पाठिंबा देणारे छोटे पक्ष आणि अपक्षांच्या जोरावर महाविकास आघाडीला चौथी जागा जिंकण्याची संधी आहे. आघाडीत सर्वाधिक मते ही शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे शिवसेनेने सहावी जागा लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. याबाबत बोलताना अनिल परब म्हणाले, शिवसेना सहावी जागा लढणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीकडे आवश्यक मते आहेत. त्यामुळे आम्ही दोन जागा लढणार आहोत.

विशेष म्हणजे, रविवारी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली होती. या चर्चेनंतर शिवसेनेने ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखविली असली, तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीत त्यांना पाठिंबा देण्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

संभाजीराजे निर्णय घेण्यास सक्षम : फडणवीस

नागपूर : संभाजीराजे शिवसेनेत जातात किंवा नाही, शिवसेना त्यांना तिकीट देते किंवा नाही, याबद्दल मला काहीही माहिती नाही. शिवसेनेला काय करायचे आहे, त्याबद्दल ते स्वतः ठरवतील आणि संभाजीराजे स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहेत, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी येथे व्यक्‍त केले.

आपले राज्य आणि आपलेच गृहमंत्री आहेत, म्हणून पोलिस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.

अपक्ष म्हणून पाठिंबा देण्याचे संभाजीराजेंचे आमदारांना पत्र

संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी, भाजप आणि अपक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. आता त्यांनी राज्यातील सर्व आमदारांना पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

राज्यसभा निवडणुकीत मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करीत आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या 42 मतांची आवश्यकता आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवर विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एका जागेसाठी कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. या जागेवर अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, असे आवाहन सर्व राजकीय पक्ष आणि अपक्ष आमदारांना केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

Back to top button