भाजपमध्ये विनायक मेटे, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड यांच्यापैकी कुणाचे तिकीट कापणार? | पुढारी

भाजपमध्ये विनायक मेटे, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड यांच्यापैकी कुणाचे तिकीट कापणार?

मुंबई; दिलीप सपाटे : राज्यसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली असतानाच आता विधान परिषदेच्या रिक्त होणार्‍या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ही निवडणूक जूनमध्येच होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपला चार जागा निवडून आणायच्या आहेत. मात्र, त्यांच्याकडे तगड्या दावेदारांची संख्या मोठी असल्याने उमेदवारांची निवड करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची निवड पक्की असली, तरी निवृत्त होणारे विनायक मेटे, सदाभाऊ खोत आणि प्रसाद लाड या तिघांनाही उमेदवारी मिळणे अवघड आहे. कारण, भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ आणि कृपाशंकर सिंह हे या निवडणुकीच्या शर्यतीत प्रबळ दावेदार आहेत.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संजय दौंड (राष्ट्रवादी काँग्रेस), दिवाकर रावते, सुभाष देसाई, रवींद्र फाटक (शिवसेना), विनायक मेटे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर (भाजप) हे दहा सदस्य जुलै महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात निरोपही देण्यात आला आहे. त्यापैकी रवींद्र फाटक हे ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आले आहेत. उर्वरित नऊ सदस्य हे विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. भाजपचे आर. आर. सिंह यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनाही भाजपने विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर पाठविले होते. या जागेसाठीदेखील सोबतच निवडणूक होणार असल्याने आता दहा जागा या विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार आहेत.

भाजपचा विचार करता प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना तिकीट द्यावेच लागणार आहे. मात्र, विनायक मेटे, सदाभाऊ खोत आणि प्रसाद लाड यांच्यापैकी कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता आहे.ज्यांच्या पारड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वजन पडेल, त्यांचा मार्ग सुकर होऊ शकतो.

सदाभाऊंचा मार्ग बिकट
सदाभाऊ खोत यांना माजी खासदार राजू शेट्टी यांचा रोष पत्करून भाजपने राज्य मंत्रिपद दिले होते. तरीही ते फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. आता पुन्हा एकदा राजू शेट्टी हे महाविकास आघाडीपासून दूर झाले असून, नजीकच्या काळात भाजपच्या जवळ येण्याची शक्यता आहे. अशावेळी सदाभाऊ खोत यांची पुन्हा वर्णी लागणे अवघड असल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. तर विनायक मेटे हे शिवसंग्राम या घटक पक्षाचे सर्वेसर्वा असले, तरी भाजप सत्ता काळात त्यांना कबूल करूनही मंत्रिपद दिले गेले नव्हते. आठवले यांना केंद्रात, तर महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांना राज्यात मंत्रिपदे मिळाली होती. आता आमचे विधान परिषद सदस्यत्व तरी कायम राहावे, असे शिवसंग्रामचे म्हणणे आहे. प्रसाद लाड हेदेखील फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. मुंबई महापालिकेच्या द़ृष्टीने त्यांचीही पक्षाला गरज असल्याने कोणाचा पत्ता कट करायचा, हा मोठा पेच भाजपपुढे आहे.

निवृत्त होणारेे चारही प्रमुख नेते बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे मूळ भाजपमधूनही उमेदवारीची मागणी होऊ शकते. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना यावेळी तरी विधान परिषदेवर पाठवावे, अशी मागणी पुढे येऊ शकते. आधीच्या निवडणुकीत ओबीसी नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने संधी देत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. यावेळी ओबीसी चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांना संधी द्यावी, अशी त्यांच्या समर्थकांची भावना आहे. याशिवाय काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यादेखील उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. मुंबई महापालिका निवडणूक पाहता भाजपने मागील निवडणुकीत उत्तर भारतीय व्होटबँक मजबूत करण्यासाठी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांना विधान परिषदेवर पाठविले आहे. आता कृपाशंकर सिंह यांचा नंबर लागतो का? याबाबत चर्चा सुरू आहे.

Back to top button