सोनिया गांधींकडे राष्ट्रवादीची तक्रार; लवकरच परिणाम दिसतील : नाना पटोले | पुढारी

सोनिया गांधींकडे राष्ट्रवादीची तक्रार; लवकरच परिणाम दिसतील : नाना पटोले

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मदत करत आहे. ज्यासाठी हे सरकार स्थापन झाले त्याचे उल्लंघन होत आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेबाबत आम्ही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या लवकरच याबाबत निर्णय घेतील आणि त्याचे परिणामही दिसतील, असे सूचक वक्‍तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासोबत काँग्रेसचा लिखित करार झालेला असताना, राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप पटोले यांनी केला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सामील झाली. ज्या मुद्द्यांवर काँग्रेसने पाठिंबा दिला त्यांचे उल्लंघन झाले आहे. सोनिया गांधी यांचा अपमान झाला आहे. सत्तेत राहण्यासाठी अपमान सहन करायचा हे आम्हाला चालणार नाही, असे ते म्हणाले.

काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार का? या प्रश्‍नावर पटोले म्हणाले, येणार्‍या काही दिवसांत त्याचे परिणाम दिसतील. ‘एक कुटुंब, एक तिकीट’ असा ठराव काँग्रेसने केला असून, त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात आगामी निवडणुकीपासून केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

अजित पवार लवकर बोला…

पहाटेच्या शपथविधीचा विषय वारंवार उपस्थित होत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर लवकर बोलावे, असा टोला पटोले यांनी लगावला.

भांड्याला भांडे लागणारच : पवार

नाना पटोले यांनी राष्ट्रवादीबद्दल सोनिया गांधींकडे केलेल्या तक्रारीबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, त्यांच्या पक्षनेत्यांशी त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्‍न आहे. मात्र, आघाडी सरकार चालवताना भांड्याला भांडे लागणारच. असे विषय फार वाढवायचे नसतात.

Back to top button