देशभरात एप्रिलमध्ये 88 लाख नोकर्‍या; रोजगार निर्मिती कमीच | पुढारी

देशभरात एप्रिलमध्ये 88 लाख नोकर्‍या; रोजगार निर्मिती कमीच

मुंबई ; पुढारी डेस्क : कोव्हिड-19 महामारीच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत असल्याचे सांगितले जाते. त्याचेच निदर्शक म्हणून एप्रिलमध्ये देशात आणखी 88 लाख व्यक्तींना रोजगार मिळाला. मात्र, मनुष्यबळाच्या मागणीच्या तुलनेत रोजगारनिर्मिती अजूनही तोकडीच आहे.

एप्रिलमध्ये देशातील कर्मचारी-कामगारांची संख्या 88 लाखांनी वाढून 43.72 कोटींवर पोहोचली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतरचा हा सर्वाधिक आकडा आहे, असे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनामीचे (सीएमआयई) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी सांगितले. मार्चच्या अखेरीस देशातील श्रमबळ 42.84 कोटी होते. देशातील रोजगारप्राप्त व्यक्तींच्या संख्येत 2021-22 मध्ये महिन्याला सरासरी दोन लाखांची भर पडली आहे.

मार्चमध्ये ज्यांच्या हातांना काम नव्हते, असे लोकही एप्रिलमध्ये श्रमबाजारात परत आले, असे सीएमआयईच्या अहवालात म्हटले आहे. एप्रिलमध्ये श्रमिकबळात 88 लाखांची वाढ होण्यापूर्वीच्या तीन महिन्यांत तब्बल 1.2 कोटींची घसरण झाली होती. बाजारातील मागणीनुसार रोजगारांच्या उपलब्धतेत बदल होतो, असे व्यास म्हणाले.

Back to top button