नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना नवाबभाई चालतो, मुन्‍नाभाई नाही | पुढारी

नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना नवाबभाई चालतो, मुन्‍नाभाई नाही

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे सुसंस्कृत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुन्‍नाभाईची भाषा करीत आहेत. त्यांना नवाबभाई चालतो; पण मुन्‍नाभाई चालत नाही, हे दुर्दैव आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याऐवजी मला मुख्यमंत्री केले होते. आज बाळासाहेब असते; तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी पत्रकार परिषदेत निशाणा साधला.

शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान नाही; तर ते शिव्या संपर्क अभियान आहे. चेष्टा, विनोद करणे सोपे आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये शिवसैनिक आणि फेरीवाले आणून बसवले होते, असा आरोप राणे यांनी केला.

तुम्ही 10 वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिलात तरी माझ्या आठ महिन्यांच्या कामाची बरोबरी तुम्ही करू शकणार नाही. अडीच वर्षांत तुम्ही काहीही काम केले नाही. मंत्रालयात जायचे नाही. फक्‍त व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे भाषण करायचे, असा राज्याचा कारभार होत नसतो. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या काळात सर्वाधिक लोक मृत्युमुखी पडले. दुसरीकडे, राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते उखडले आहेत. मुंबईतील नालेसफाई करण्यात आलेली नाही, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करा, असे आवाहन करूनही राज्य सरकारने कर कमी केला नाही. मुख्यमंत्र्यांना राजकोषीय तूट यातील काही कळत नाही. विकासकामांवर कसा पैसा खर्च करायचा हेदेखील कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

राऊतांची संगत भोवली

सुसंस्कृत मुख्यमंत्री केमिकल लोच्याची भाषा वापरतात; पण त्यांना मांडीला मांडी लावून बसलेले नवाबभाई कसे चालतात? असा सवाल राणे यांनी केला. संजय राऊत यांची संगत उद्धव ठाकरे यांना भोवली आहे, असे ते म्हणाले.

Back to top button