मुंबई : दारुच्या नशेत विमानात गोंधळ; प्रवाशाला अटक | पुढारी

मुंबई : दारुच्या नशेत विमानात गोंधळ; प्रवाशाला अटक

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : दारुच्या नशेत विमानात सहप्रवाशासोबत क्रु मेंबरशी वाद घालून गोंधळ घालणार्‍या एका प्रवाशाला सहार पोलिसांनी अटक केली. मोहम्मद सरफुद्दीन अब्दुल कादर अल्वर असे या मद्यपी प्रवाशाचे नाव असून अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मोहम्मद सरफुद्दीनमुळे बंगलोरला जाणार्‍या या विमानाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने लॅडिंग करावे लागल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहम्मद सरफुद्दीन हा मूळचा केरळच्या कल्यारा मंगलपट्टी, नूर मंजिलचा रहिवाशी आहे. शनिवारी तो दोहा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बंगलोर येथे जाण्यासाठी आला होता. मात्र बसण्याच्या जागेवरुन त्याचे काही क्रु मेंबरसोबत वाद झाला होता.

त्याची समजूत काढून त्याला दुसरीकडे बसण्याची जागा देण्यात आली होती. काही वेळानंतर त्याने दारुच्या नशेत या कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून वाद घालण्याचा प्रयत्न केला. विमान प्रवासादरम्यान मद्यप्राशन करण्यास सक्त मनाई असताना त्याने मद्यप्राशन करुन सहप्रवाशांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. क्रु मेंबरसह फ्लाईटच्या कॅप्टनसोबत वाद घातला. त्यांच्याशी विनाकारण भांडण सुरु केले होते. वारंवार समजूत काढूनही त्याचे त्यांच्याशी गैरवर्तन सुरु होते. त्यामुळे या कर्मचार्‍यांनी विमानाच्या वैमानिकाला ही माहिती दिली होती.

या प्रवाशाचे गैरवर्तन त्याच्यासह त्याच्यासोबत प्रवास करणार्‍या प्रवाशांसह इतर कर्मचार्‍यांच्या जिवावर बेतू शकत असल्याने वैमानिकाने तातडीने विमान लॅडिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे बंगलोरला जाणार्‍या या विमानाला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतविण्यात आले होते. या घटनेची माहिती नंतर विमानतळावरील सुरक्षारक्षकांना देण्यात आली होती.

या माहितीनंतर या सुरक्षारक्षकांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध नंतर एअरक्राफ्ट नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत त्याला सहार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Back to top button